अनुभव सिन्हा दिग्दर्शित 'अभी तो पार्टी शुरू हुई है' सिनेमात सेक्स वर्करच्या भूमिकेत ऋचा चढ्ढा दिसणार आहे. नुकताच 'आर्टिकल 375 ' सिनेमात ऋचा झळकली होती. या सिनेमातील तिच्या भूमिकेचे विशेष कौतुक करण्यात आले होते. सध्या या भूमिकेसाठी ऋचा अधिक मेहनत घेत आहे. सेक्स वर्कर यांची देहबोली, बोलीभाषा अशा सगळ्या गोष्टींचे निरिक्षण ती करत आहे.
मी ज्यावेळी या चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं, त्यावेळी मला काहीतरी हटके करायचं होतं. वेगळं काही तरी रसिकांनाही पसंत पडेल. लोकांनाही वाटलं पाहिजे काहीतरी नवं पाहायला मिळणार आहे. हटके पाहायला मिळेल असा विश्वास लोकांच्या मनात निर्माण झाला पाहिजे. रसिकांच्या पसंतीची पावती, त्यांचा विश्वास आणि प्रेम हेच माझ्यासाठी प्रेरणास्त्रोत आहे.
मला प्रत्येक प्रकारचा चित्रपट करायचा आहे. वेगवेगळ्या आव्हानात्मक भूमिका साकारायच्या आहेत. एकच पठडीतल्या भूमिका करण्यापेक्षा रसिकांना काय हवंय, त्यांना काय भावतं, त्यांना काय आवडतं तशा सगळ्या भूमिका करायला आवडेल. मग तो कुठलाही विषय असो, सामाजिक असो, अॅक्शन असो किंवा मग विनोदी विषयाचा चित्रपट असो. जो विषय रसिकांना आवडेल त्यात मला कधीही काम करायला आवडेल. त्यामुळेच सेक्स वर्कर ही भूमिका साकारणे माझ्यासाठी एक आव्हान असणार आहे.
तसेच तिने दिलेल्या एका मुलाखती मध्ये सांगितले होते की, बॉलिवूडमधील लैंगिक शोषणाविषयी चर्चा केली तर बरेचसे अभिनेते आणि अन्य लोक केवळ त्यांचे कामच नव्हे तर नावही गमावून बसतील. ऋचाला सामाजिक मुद्द्यावर बिनधास्त बोलण्यासाठी ओळखले जाते. यावेळी तिने लैंगिक शोषणावर आपले मत मांडताना म्हटले की, जे निर्माते आणि दिग्दर्शक महिलांवर आधारित चित्रपटांची निर्मिती करून स्वत:ला प्रगतशील असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न करीत आहेत, ते सर्व लैंगिक शोषणाचा मुद्दा समोर येताच उद्ध्वस्त होतील. जर हॉलिवूडप्रमाणेच बॉलिवूडमध्येही अशाप्रकारचा मुद्दा चर्चिला गेला तर सर्व काही बदलून जाईल.