बॉलिवूड अभिनेत्री रिचा चड्ढाचा (Richa Chadha) नुकताच 'फुकरे 3' रिलीज झाला जो सुपरहिट ठरला. तिने सिनेमात पंजाबी मुलीची भूमिका साकारली. रिचा तिच्या हटके भूमिकांनी आणि अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांचं मन जिंकते. रिचाला ती २४ वर्षांची असताना हृतिक रोशनच्या आईची भूमिका ऑफर झाली होती असा खुलासा तिने नुकताच केला.
एका मुलाखतीत रिचा म्हणाली, 'मी २४ वर्षांची असताना मला एका कास्टिंग डायरेक्टरने हृतिकच्या आईची भूमिका ऑफर केली होती. त्यांना कोणीतरी सांगितलं की मी वयस्कर महिलेची भूमिका चांगल्या प्रकारे निभावू शकते. त्यामुळे काहीही विचार न करता त्यांनी मला या भूमिकेसाठी विचारलं.'
ती पुढे म्हणाली, 'मला ही गोष्ट खूपच चुकीची वाटते जेव्हा तुम्ही तरुण कलाकारांच्या चेहऱ्यावर एजिंग करुन त्यांना सिनेमात कास्ट करता. मी ही भूमिका स्वीकारली असती तर हा सीनिअर अभिनेत्रींसोबत अन्याय झाला असता जे खरंतर अशा भूमिकेसाठी योग्य आहेत. कारण तसंही सीनिअर अभिनेत्रींकडे खूप कमी पर्याय असतात. ती भूमिका नाकारल्यानंतर त्या कास्टिंग डायरेक्टरने मला परत कधीच बोलावलं नाही.'
रिचा चड्ढाने गँग्स ऑफ वासेपूरमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीच्या आईची भूमिका साकारली होती. यानंतरच तिला अशा वयस्कर महिलांच्या भूमिका ऑफर होऊ लागल्या.