Join us

रिचा चड्ढाचा महिला आयोगाला प्रश्न, माझ्या तक्रारीचं काय झालं?, पायल म्हणाली - माफी नाही मागत...

By अमित इंगोले | Published: October 09, 2020 11:49 AM

आता रिचाने सोशल मीडियावर पोस्ट टाकून महिला आयोगाला विचारणा केली आहे की, तिने केलेल्या तक्रारीचं काय झालं? जी तिने पायल घोषआधीच केली होती.

दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचा आरोप लावणाऱ्या पायल घोषवर अभिनेत्री रिचा चड्ढाने मानहानीचा दावा ठोकला होता. यासोबतच रिचाने राष्ट्रीय महिला आयोगातही तक्रार दाखल केली होती. आता रिचाने सोशल मीडियावर पोस्ट टाकून महिला आयोगाला विचारणा केली आहे की, तिने केलेल्या तक्रारीचं काय झालं? जी तिने पायल घोषआधीच केली होती.

रिचा चड्ढाने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे ज्यात पायल घोष राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांच्यासोबत दिसत आहे. या फोटोसोबत रिचाने लिहिले की, 'मला अजून २२ सप्टेंबर २०२० ला केलेल्या तक्रारीबाबत महिला आयोगाकडून काहीच कळवण्यात आलेले नाही. ही तक्रार मिस घोष विरोधात दाखल केली होता. तिनेच दिग्दर्शकाविरोधातील केसमध्ये माझं नाव घेतलं होतं. माझी तक्रार पायल घोषच्या तक्रारीआधी नोंदवली गेली होती'. (रिचा चड्ढाचा पायल घोष आणि कमाल आर खानला दणका, दोघांच्या अडचणी वाढणार...)

एका दुसऱ्या ट्विटमध्ये रिचाने NCW मध्ये दाखल केलेल्या तिच्या तक्रारीचा स्क्रीनशॉटही शेअर केलाय. रिचाने तिच्या या ट्विटमध्ये महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनाही टॅग केलंय.

त्यानंतर रिचाने बॉम्बे हायकोर्टाच्या ऑर्डरची एक कॉपीही शेअर केली आहे. ज्यात लिहिले आहे की, तिच्याकडून दाखल करण्यात आलेल्या मानहानीच्या दाव्यावर पायल घोष सेटलमेंट करायला तयार आहे. पायलचे वकील नितीन सातपुते यांनी सुनावणी दरम्यान कोर्टात सांगितले होते की, त्यांची क्लाएंट पायल तिचं वक्तव्य मागे घेऊन सेटलमेंट करायला तयार आहे. ( पायल घोषचा ‘यु टर्न’; ‘त्या’ वक्तव्यासाठी रिचा चड्ढाची माफी मागायला तयार)

पण पायल घोषने नंतर ट्विट करून सांगितले होते की, ती कुणाचीही माफी मागणार नाही. तिने लिहिले की, 'मी कुणालाही माफी मागत नाहीये. मी ना काही चुकीचं केलंय ना कुणाबाबत चुकीचं वक्तव्य केलंय. मी तेच बोलले जे मला अनुराग कश्यपने सांगितले होते'.

आता हे बघावं लागेल की, या प्रकरणात पुढे काय होईल. कारण बॉम्बे हायकोर्टात रिचाच्या केसची पुढील सुनावणी १२ ऑक्टोबरला होणार आहे. कोर्टाच्या ऑर्डरनुसार पुढील सुनावणीत पायलने या केसमध्ये सेटलमेंट करण्याची सहमती दर्शवली आहे. 

टॅग्स :रिचा चड्डापायल घोषबॉलिवूडलैंगिक छळ