Join us  

सांगीतिक रहस्यनाट्याचा श्रीमंत थाट!

By admin | Published: January 24, 2016 1:09 AM

नाटकाचा पडदा उघडताच क्षणी प्रथम दृष्टीस पडणारी गोष्ट म्हणजे, त्या नाटकाचे नेपथ्य! असं म्हणतात की, नेपथ्याला उत्स्फूर्तपणे टाळी पडली की, त्या नाटकाची नांदीसुद्धा अचूक घुमणार!

(तिसरी घंटा)- राज चिंचणकरनाटक - तिन्हीसांज नाटकाचा पडदा उघडताच क्षणी प्रथम दृष्टीस पडणारी गोष्ट म्हणजे, त्या नाटकाचे नेपथ्य! असं म्हणतात की, नेपथ्याला उत्स्फूर्तपणे टाळी पडली की, त्या नाटकाची नांदीसुद्धा अचूक घुमणार! ‘तिन्हीसांज’ या नाटकाचा पडदा दूर होताच, अशीच टाळी पडते आणि या नाटकाचे वेगळेपण सुरुवातीलाच थेट समोर येते. अधिकतर दिवाणखान्यात अडकलेल्या नाटकांपासून ‘तिन्हीसांज’ बरेच दूर आहे. त्यामुळे पहिल्या क्षणापासून हे नाटक मनाची पकड घेते. रंगमंचावरचा हा सगळा थाट श्रीमंती आहे आणि पुढे नाटकात येत जाणाऱ्या रहस्य, संगीत, नृत्य आदी प्रकारांना पोषक आहे. या नाटकातल्या गोष्टीचा काळ बऱ्यापैकी जुना आहे. औंध संस्थानचा राजगायक मोहन आणि भोर संस्थानची कन्या भारतीदेवी हे दाम्पत्य या वाड्यात राहात आहे. त्यांना आशुतोष हा मुलगा आहे. भारतीदेवी ही पेशाने वकील आहे. गायक असलेल्या मोहनने काही कारणास्तव त्याची गायकी पार सोडली आहे. एवढेच नव्हे, तर दर संकष्टी चतुर्थीला होणाऱ्या आरतीच्या वेळी मोहन त्याचे संतुलन गमावून बसतो आणि त्याच्यात न्यायाधीश संचारतो. हा प्रकार संपुष्टात आणण्याचा भारतीदेवीचा प्रयत्न सुरू असतो. अशातच एक दिवस भारतीदेवीला शारदा नामक अशील एका केसच्या संदर्भात भेटायला येते आणि इथे या नाटकाला खरी कलाटणी मिळते. तिन्हीसांज अर्थात, कातरवेळेची गडद छाया या संपूर्ण नाट्यावर आहे आणि त्यानुसार केलेली संहितेची बांधणी योग्यच म्हणावी लागेल. या गोष्टीत प्रेम, उत्कटता, प्रतारणा अशा विविध भावनांसह संगीत, नृत्य, कायदा, रहस्य असे बरेच प्रकार लेखक शेखर ताम्हाणे यांनी लीलया हाताळले आहेत. जुन्या काळाचा संदर्भ वापरत उभारलेल्या या नाटकात केवळ पात्रेच बोलत नाहीत, तर त्यांची मनोवस्थाही संवाद साधत जाते आणि त्यातून त्यांचे अंतर्मन व्यक्त होत राहते. या नाटकाची दिग्दर्शिका संपदा जोगळेकर-कुळकर्णी हिच्यासाठी अशा चाकोरीबाहेरच्या नाटकाचे दिग्दर्शन करणे म्हणजे आव्हान होते, पण तिने ते मोठ्या संयमाने पेलले आहे. संहितेची लय सांभाळत, तिने हे नाट्य त्याच पद्धतीने मंचित केले आहे. अभिनय, संगीत व नृत्य यांची योग्य सांगड तिने घातली आहे आणि एकजिनसीपणाचे उदाहरण कायम केले आहे. मात्र, हे सगळे ठीक असले, तरी नाटकात उभारले गेलेले नेपथ्य थोडे कमी असायला हवे होते. कारण या भपकेपणात रंगमंचावरची पात्रे विरघळून गेल्यासारखी वाटतात. संदेश बेंद्रे याने जुन्या संस्थानिक वाड्याच्या उभ्या केलेल्या नेपथ्याचा स्वतंत्रपणे विचार केल्यास, ते भन्नाट वाटते आणि त्यासाठी त्याने घेतलेली मेहनत स्पष्ट दिसते. या नाटकात आणलेला लाइव्ह पाऊस वगैरे गोष्टींनी नाट्याला नैसर्गिकता प्राप्त करून दिली आहे. यातला कारंजा मात्र, बाळबोध वाटतो. राजन ताम्हाणे यांची प्रकाशयोजना बोलकी आणि उठावदार आहे. परीक्षित भातखंडे याचे संगीत श्रवणीय आहे. पूर्णिमा ओक यांची वेशभूषा पात्रांना साजेशी आहे. या तिन्हीसांजेत अभिनयाची पहाट झाली आहे आणि या पहाटेची किरणे रंगमंचावर अलगद उतरली आहेत. शीतल क्षीरसागर हिने भारतीदेवींच्या व्यक्तिरेखेतले विभ्रम कमालीच्या ताकदीने पेश केले आहेत. करारीपणा, कठोरता, प्रेमभावना असे विविध रंग तिने मुक्तपणे पसरवले आहेत. तिची अदबशीर देहबोली आणि संवादफेक उत्तम आहे. अंगद म्हसकर याने यात कलासक्त मोहन नजाकतीने सादर केला आहे. राजगायकाचा बाज त्याने योग्य तऱ्हेने पकडला आहे आणि तो सूरमयी आहे. फक्त त्याच्या शरीराची बारीक चण मात्र, त्याच्या या पात्राशी फटकून वागताना जाणवत राहते. नाटकात शारदा, तसेच शकिला रंगवणाऱ्या शाल्मली टोळ्ये हिने दोन्ही भूमिका ठोस केल्या आहेत आणि तिच्यातली नृत्यनिपुणता यात प्रकर्षाने समोर येते. या नाटकात मालती साकारणाऱ्या सायली परब हिचा खास उल्लेख करावा लागेल. तिची मालती थेट मनावर छाप उमटवते. तिने ही व्यक्तिरेखा अस्सल रंगवत लक्षवेधी केली आहे. श्रीराज ताम्हणकर (आशुतोष) या बालकलाकाराचे प्रत्यक्ष तबलावादन जमून आले असले, तरी ते या नाट्याचा एक भाग म्हणून ठसत नाही. गौतम मुर्डेश्वर, सचिन शिर्के या कलाकारांची योग्य साथ नाटकाला लाभली आहे. त्रिकूट निर्मित या नाटकाचे शीर्षक जरी तिन्हीसांज असले, तरी ते अनुभवताना मनाची तिन्हीसांज मात्र नक्कीच होणार नाही. उलट अतिशय वेगळ््या पठडीतले हे नाटक आहे आणि त्याचा एकंदर डौल लक्षात घेता, ते अनोखा अनुभव देणारे आहे.