Join us

रिंकू राजगुरू व आकाश ठोसर पुन्हा करणार प्रेक्षकांना सैराट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2019 1:41 PM

'सैराट' सिनेमातील सर्वांची लाडकी जोडी अभिनेत्री रिंकू राजगुरु आणि अभिनेता आकाश ठोसर पुन्हा एकदा एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत.

ठळक मुद्देरिंकू व आकाश दिसणार झुंड चित्रपटातरिंकू व आकाशने नुकतेच नागपुरात केले चित्रीकरण

'सैराट' चित्रपटातील प्रेमकथेतून संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांना आर्ची व परशाने अक्षरश: वेड लावले. आता ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांना वेड लावण्यासाठी सज्ज झाली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरू व परशा म्हणजेच आकाश ठोसर पुन्हा एकदा एका वेगळ्या सिनेमात पाहायला मिळणार आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ते दोघे दिग्दर्शक नागराज मंजुळेचा आगामी चित्रपट 'झुंड'मध्ये दिसणार आहेत. 

गेल्या अनेक दिवसांपासून नागराज मंजुळेचा आगामी चित्रपट 'झुंड' बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. अमिताभ बच्चन या सिनेमात प्रमुख भूमिका साकारत आहेत. नागराज मंजुळे आणि अमिताभ बच्चन यांना एकत्र प्रोजेक्टमध्ये काम करताना पाहण्यासाठी त्यांचे चाहते खूप उत्सुक आहेत. त्यात अमिताभ बच्चन यांनी 'झुंड' चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या सेटवरील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.  त्यामुळे या चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखीन वाढली आहे. 

त्यात आता सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रिंकू व आकाशने आठवडाभर नागपुरात झुंड चित्रपटाचे चित्रीकरण केले आहे. रिंकू आणि आकाशने एका रात्रीत स्टार होणे काय असते, हे सैराटमुळे अनुभवले आहे. त्यात अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्यास मिळाल्यामुळे ते दोघे खूप खूश आहेत. 'झुंड' चित्रपटात अमिताभ बच्चन झोपडपट्टीतील तरुणांना फूटबॉल प्रशिक्षण देणाऱ्या विजय बारसे यांची भूमिका साकारताना दिसणार आहेत. तर रिंकू आणि आकाश फूटबॉलपटूंच्या भूमिकेत दिसणार आहेत. रिंकूचा आता 'सैराट'नंतर 'कागर' हा दुसरा सिनेमा लवकरच प्रदर्शित होत आहे. तर आकाशने 'फन अनलिमिटेड' हा सिनेमा आणि 'लस्ट स्टोरीज' या वेबसिरीजमध्ये काम केले आहे. रिंकू, आकाश, अमिताभ बच्चन आणि नागराज मंजुळे या नावाजलेल्या कलाकारांची कलाकृती पाहणे कमालीचे ठरणार आहे.

टॅग्स :अमिताभ बच्चनरिंकू राजगुरूआकाश ठोसरनागराज मंजुळे