राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त अभिनेत्री रिंकू राजगुरूची प्रमुख भूमिका असलेला कागर हा बहुचर्चित चित्रपट १४ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. व्हॅलेंटाईन डेच्या मुहुर्तावर हा चित्रपट प्रेमाचा उत्सव साजरा करणार आहे.
सुधीर कोलते आणि विकास हांडे यांच्या 'उदाहरणार्थ' या संस्थेने चित्रपटाची निर्मिती केली आहे. राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त मकरंद माने यांनी कागरचे दिग्दर्शन केले आहे. वडील-मुलाच्या नात्यावर आधारित रिंगण आणि चार शाळकरी मुलांची गोष्ट असलेला यंग्राड हे दोन चित्रपट मकरंदने या पूर्वी दिग्दर्शित केले होते. रिंगण आणि यंग्राड हे दोन्ही चित्रपट भिन्न पद्धतीचे होते. त्यामुळे आता कागर या चित्रपटाविषयी नावापासूनच उत्सुकता निर्माण झाली आहे. मुळचे अकलूजचे असलेले आणि राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेले मकरंद आणि रिंकू या चित्रपटातून पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत.
कागरचं पोस्टरही वैशिष्ट्यपूर्ण आहे. एका पडद्याआड उभी असलेली रिंकू या पोस्टरमध्ये पाहायला मिळतेय. पोस्टरमध्ये पडदा त्यावर आजूबाजूला असलेल्या वेलींची गराडा आणि त्यात रिंकूच्या दिसण्यातला साज अन नजरेतील करारीपणा यांचे भाव विलक्षण आहेत. मात्र त्यामुळे कथानकाचा काहीच अंदाज बांधता येत नाही. या पोस्टरमुळे चित्रपटाचं कथानक आणि रिंकूसह असलेल्या स्टारकास्टविषयी उत्सुकता नक्कीच वाढली आहे.
कागरची व्याख्या अधिक स्पष्ट करायला, १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन अजून फुलवायला, एकमेकांमधलं नातं घट्ट करायला आणि नजरेतल्या भावना अलगद अनुभवण्यासाठी आम्ही 'कागर' घेऊन येत आहोत,' असं मकरंदने सांगितले.
'कागर' चित्रपटातील पोस्टरवरील नावाचा फाँट हा बघताक्षणी अॅग्रेसिव्ह वाटत होता. तसेच या डिझाईनमध्ये उधळलेला गुलाल हा कुतूहलतेचा विषय ठरत होता. लाल कायम विजयाचा रंग आहे. हा विजय नक्की कोणावर आहे. यामध्ये केलेली मात ही असुरावर आहे की, स्वतःमध्ये अडकलेल्या आपल्यावर आहे याचा अंदाज हे नाव बघून लावला जात होता. रिंकूचा हा कमबॅक चित्रपट असल्याने या चित्रपटाविषयी प्रेक्षकांच्या मनात चांगलीच उत्सुकता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचे चित्रीकरण तिच्याच अकलूजमध्ये करण्यात आले आहे.