अभिनेता आमीर खान याची मुख्य भूमिका असलेल्या ‘दंगल’ची प्रेक्षक आतुरतेने प्रतीक्षा करीत आहेत. प्रदर्शनापूर्वीच चित्रपटाबद्दलची प्रेक्षकांमधील उत्सुकता परमोच्च शिखरावर पोहोचली आहे. चित्रपटाचा ट्रेलर शिवाय गाणीही लोकांच्या पसंतीस उतरली आहेत. आमीरच्या अन्य चित्रपटांप्रमाणे ‘दंगल’सुद्धा पूर्णत: त्याच्या रंगात रंगलेला चित्रपट आहे. कुस्तीचा आखाडा गाजवणारा एक पहिलवान, मुलींना घडवू पाहणारे एक वडील आणि प्रशिक्षक या भूमिका पूर्ण ताकदीने निभाविण्याचे कौशल्य ‘दंगल’मध्ये आमीरने साकारले आहे. मुलींना अभिशाप मानणाऱ्या समाजाच्या मानसिकतेवर या चित्रपटातून कठोर भाष्य करण्यात आले आहे. अर्थात चित्रपट पडद्यावर पाहताना हे भाष्य कठोर नाही तर विनोदी आणि तेवढेच मार्मिक वाटते. यातच दिग्दर्शकाचे खरे कौशल्य आहे. महावीर सिंग फोगट यांच्या भूमिकेतील आमीर खान आपल्या तिसऱ्या मुलीच्या जन्मानंतर ‘मारा सपना तो छोरा ही पुरा कर सकेंगा’ असे म्हणतो. त्याची ही एक ओळ , मुलगाच हवा या समाजातील एक हटवादी मानसिकतेचे दर्शन घडवते. इथून हरियाणाच्या एका लहानशा गावातून चित्रपटाची कथा सुरू होते. महावीर सिंग फोगट (आमीर) हा एक राष्ट्रीय पातळीवरील कुस्तीपटू आहे. राष्ट्रीय स्तरावरील अनेक कुस्ती स्पर्धांमध्ये त्याने पदके मिळवली आहेत. गरिबीमुळे आपले आखाड्यातील करिअर मागे सोडून तो नोकरी करण्याचा पर्याय स्वीकारतो. मात्र, देशासाठी सुवर्णपदक मिळवण्याची एक सुप्त इच्छा त्याच्या मनात घर करून बसते. सुवर्णपदक जिंकण्याचे आपले स्वप्न केवळ आपला मुलगाच पूर्ण करू शकेल, असा विश्वास त्याला आहे. त्यामुळे तीन मुलींच्या पाठी मुलगाच व्हावा, अशी त्याची इच्छा आहे. पण चौथीही मुलगीच होते आणि महावीर कमालीचा निराश होतो. आता आपले स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही, अशी तो स्वत:ची समजूत काढतो. अर्थात एक दिवस अचानक त्याच्या मोठ्या मुलीचा लढाऊ बाणा त्याला दिसतो आणि इथून पुढे संपूर्ण चित्रपट घडतो.कुस्ती हा विषय दंगल चित्रपटात आकर्षक पद्धतीने मांडण्यात आला आहे. शिवाय त्यास वास्तवदर्शी प्रसंग, तिरकस विनोद व दर्जेदार अभिनयाची जोडही आहे. इच्छा, महत्त्वाकांक्षा, चिकाटी, ध्यास, अपेक्षाभंग, अहंकार, संयम आणि माया असे मानवी स्वभावाचे विविध पैलू यात दिसतात. कुस्तीमधील काही कंटाळवाण्या गोष्टींना विनोदाची झालर लावून मनोरंजक बनवण्याचे दिग्दर्शकाचे प्रयत्नही यशस्वी झाले आहेत. त्यामुळेच ग्रामीण पार्श्वभूमी, खेडूत व्यायाम, हरयाणवी बोलीभाषा या चित्रपटाला कुठेच रटाळ बनवत नाही. सुवर्णपदक जिंकण्याची स्वत:ची महत्त्वाकांक्षा महावीर सिंग आपल्या मुलींद्वारे पूर्ण करू इच्छितो आणि आपली ही अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मुलींसोबत कमालीचा कठोर होतो. त्याच्यातील कठोर प्रशिक्षक दर्शवण्यासाठी तो मुलींना पाण्यात ढकलून देतो, असे एक दृश्य मध्यांतरापूर्वी गुंफण्यात आले आहे. कुस्तीच्या आखाड्यातील त्याच्या मुली आणि सुवर्णपदक याशिवाय महावीर सिंगला दुसरे काहीच सुचत नाही. प्रारंभी त्याच्या मुली याला थोडा विरोध करतात. पण अखेर आपल्या आंतरिक भावनांना मुरड घालत पित्याने दाखवलेल्या मार्गावर चालायला तयार होतात. केवळ पित्याच्या इच्छेखातर त्या केस कापतात. पाणीपुरी व लोणच्यासारख्या जिवापाड आवडणाऱ्या गोष्टींचा त्याग करतात. अतिशय कठोर प्रशिक्षणानंतर गीता कुस्तीचा आखाडा गाजवायला तयार होते. पण महिला कुस्तीपटू नसल्याने पुरुष पहिलवानांशी तिला लढावे लागते आणि पहिल्याच कुस्तीत ती पराजित होते. हा अतियश लज्जास्पद पराभव तिच्या जिव्हारी लागतो आणि गीता विजयाच्या महत्त्वाकांक्षेने पेटून उठते. दुसऱ्या भागात महावीरच्या कठोर प्रशिक्षणात तयार झालेली गीता कुस्तीच्या दुनियेत प्रवेश करते. इथून पुढे चित्रपटाची कथा एक वेगळे वळण घेते. येथून खऱ्या अर्थाने गीताची कथा सुरू होते. स्थानिक पातळीपासून थेट राष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचलेली गीता एका क्षणाला यशाने हुरळून जाते आणि ज्या पित्याने तिला घडवले, त्यांनाच आव्हान द्यायला उभी राहते. एका चुरशीच्या सामन्यात ती पित्यालाच हरवते. मुलीच्या हातून हरलेल्या महत्त्वाकांक्षी महावीर सिंगला मग स्वत:च्याच प्रशिक्षणावर शंका येते. यशाचा हव्यास आणि अहंकार यात अडकलेल्या मुलीचा पित्यासोबतचा भावनिक संघर्ष या चित्रपटात अतिशय ताकदीने मांडण्यात आलाय. झायरा वसिम हिने रंगवलेली बालपणीची गीता आणि फातिमा सना शेख हिने रंगवलेली मोठेपणीची गीता अफलातून आहे. साक्षी तन्वर, सान्या मल्होत्रा, गिरीश कुळकर्णी यांच्या भूमिका तेवढ्याच ताकदीच्या आहेत. ‘दंगल’ अगदी हळुवारपणे त्याच्या पात्रांमधील भाव-भावनांची कहानी दर्शवतो. कुस्ती या खेळाच्या मदतीने सुरू झालेली चित्रपटाची कथा पुढे पिता आणि मुलींची कथा बनून राहते. ज्या देशात मुलगी अद्यापही शाप मानला जातो, त्या समाजाच्या मानसिकतेवर महावीर सिंग फोगट एक घणाघाती प्रहार करतो. मुली मुलांपेक्षा कुठेही कमी नाहीत, हे तो सिद्ध करून दाखवतो. दिग्दर्शक नितेश तिवारी यांनी या चित्रपटासाठी घेतलेली मेहनत, त्यांची अभ्यासू वृत्ती पदोपदी जाणवते. त्यांचे प्रगल्भ दिग्दर्शन आणि फातिमा सना शेख, झायरा वसिम, सना मल्होत्रा यांचा तितकाच प्रगल्भ अभिनय याशिवाय ‘दंगल’ साकारूच शकला नसता, असे म्हणणे त्यामुळेच अतिशयोक्ती होणार नाही. केवळ कुस्तीच्या आखाड्यातील पहिलवानाच्या हालचाली दाखवण्यातच नाही, तर भावभावनांचे उत्कट दर्शन घडवण्यातही या मुली यशस्वी ठरल्या आहेत. काही ठिकाणी उपदेशाचा अतिरेक वाटतो. गीता आणि बबिताचे प्रशिक्षकाच्या संदर्भाने येणारे काही प्रसंग अनावश्यक लांबलेले वाटतात. पण इतके वगळले तर ‘दंगल’ मनाचा ठाव घेतो. २०१६ मधील भारतीय चित्रपटसृष्टीतील मैलाचा दगड ठरणारा चित्रपट असेच त्याचे वर्णन करावे लागेल.-जान्हवी सामंत.
दंगल - मुलींविषयीच्या मानसिकतेवर प्रभावी भाष्य
By admin | Published: December 23, 2016 2:56 AM