ज्येष्ठ संगीतकार खय्याम यांचे काल रात्री साडेनऊ वाजता हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. खय्याम यांच्या गाण्यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. नुरी, रझिया सुलतान, बाजार, उमराव जान यांसारख्या चित्रपटातील खय्याम यांची गाणी चांगलीच गाजली. पण तुम्हाला माहीत आहे का, खय्याम यांना संगीतकार बनायचे नव्हते तर त्यांना अभिनय करण्यात रस होता.
खय्याम यांना लहानपणापासूनच चित्रपटात काम करायचे होते. त्यांना चित्रपटाचे इतके वेड होते की, ते लपूनछपून चित्रपट पाहायला जात असत. त्यांच्या या चित्रपटांच्या आवडीमुळे त्यांच्या घरातले चांगलेच कंटाळले होते. एवढेच नव्हे तर ते केवळ 10 वर्षांचे असताना अभिनेता बनण्यासाठी काकाच्या घरी दिल्लीला पळून आले होते. त्यांच्या काकांनी दिल्लीतील शाळेत त्यांना टाकले आणि त्यांची संगीताप्रती आवड पाहाता त्यांना संगीत शिकवण्याची परवानगी दिली. खय्याम यांनी सुरुवातीला पंडित अमरनाथ, पंडित हुस्नलाल, भगतराम यांच्याकडून संगीताचे धडे गिरवले. याच दरम्यान त्यांची भेट पाकिस्तानमधील प्रसिद्ध संगीतकार जी.एस.चिश्तीसोबत झाली. खय्याम यांचा आवाज ऐकल्यानंतर चिश्ती यांनी त्यांना आपले साहाय्यक म्हणून काम करायला सांगितले.
सहा महिने चिश्ती यांच्यासोबत काम केल्यानंतर खय्याम 1943 मध्ये लुधियानाला परतले आणि त्यांनी काम शोधायला सुरुवात केली. पण त्याचदरम्यान दुसरे जागतिक युद्ध सुरू झाले. अनेक तरुण या युद्धात सामील होत होते. खय्याम देखील सैन्यात सामील झाले. ते दोन वर्षं तरी सैन्यात होते. त्यानंतर अभिनेते बनण्यासाठी ते मुंबईत आले. 1948 मध्ये त्यांनी अभिनेता म्हणून एस.डी.नारंग यांच्या ये है जिंदगी या चित्रपटात काम केले. पण त्यानंतर त्यांना कधीच कोणत्या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली नाही. त्यांनी बुल्लो. सी. रानी यांच्यासोबत साहाय्यक संगीतकार म्हणून काम करायला सुरुवात केली. तिथूनच एक संगीतकार म्हणून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात झाली. त्यांनी एकाहून एक हिट गाणी बॉलिवूडला दिली.