कपूर कुटुंबावर आज दु:खाचा डोंगर कोसळला. ऋषी कपूर व रणधीर कपूर यांचे छोटे भाऊ व ज्येष्ठ अभिनेत राजीव कपूर यांचे आज निधन झाले. हृदविकाराच्या झटक्यानंतर चेंबूरच्या एका रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या वर्षभरात कपूर कुटुंबावर हा तिसरा मोठा आघात आहे. ऋषी कपूर गेलेत. ऋषी कपूर यांच्या निधनाच्या दोन महिन्याआधीच त्यांची मोठी बहीण रितू नंदा यांचे निधन झाले होते. या दु:खातून कपूर कुटुंब सावरत असतानाच आज राजीव कपूर यांची प्राणज्योत मालवली.
गेल्यावर्षी ऋषी कपूर यांचे कॅन्सरने निधन झाले होते. दोन वर्षापासून कॅन्सरशी झुंज सुरु असतानाच 30 एप्रिल 2020 रोजी ऋषी कपूर हे जग सोडून गेले होते. त्यांच्या निधनाने कपूर कुटुंबासह बॉलिवूड शोकसागरात बुडाले होते.
ऋषी यांच्या निधनाच्या दोन महिन्यांआधी त्यांची मोठी बहीण रितू नंदा यांनी जगाचा निराप घेतला होता. त्यांनाही कॅन्सरने गाठले होते. एकाच दिवसांत 17000 पेन्शन पॉलिसीज विकल्याबद्दल रितू नंदा यांच्या नावाची नोंद गिनिज बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये झाली होती. 80 च्या दशकात एलआयसीच्या एजंट म्हणून त्यांनी काम सुरू केले होते. अनेक वर्षं त्यांनी हे काम केले. यानंतर त्यांनी स्वत:ची एक खाजगी विमा कंपनीही सुरू केली होती. 1969 मध्ये त्यांनी प्रतिष्ठित सुरक्षा एजन्सी एस्कॉर्ट्स ग्रूपचे मालक राजन नंदा यांच्यासोबत विवाह केला होता.2018 साली मध्ये दिवंगत ज्येष्ठ अभिनेते राज कपूर यांच्या पत्नी कृष्णा कपूर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले होते. याच्या वर्षभराआधी म्हणजे 2017 मध्ये अभिनेते शशी कपूर यांनी जगाला अलविदा म्हटले होते.