बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर आपल्या बिनधास्त व परखड स्वभावासाठी ओळखले जातात. वाद ओढवून घेणारे अभिनेते म्हणून अधिक ओळखले जातात. आपल्या परखड बोलण्यामुळे त्यांनी अनेकदा वाद ओढवून घेतले. अनेक वादग्रस्त ट्विटमुळे त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागला. पण याऊपरही ऋषी कपूर सगळ्यांना पुरून उरलेत. गेल्या काही दिवसांपासून ऋषी कपूर सारखे ट्रोल होत आहेत. पण आता मात्र त्यांनी हेटर्सचा आपल्या अंदाजात क्लास घेतला आहे.
होय, ऋषी कपूर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर प्रोफाईल स्टेट्स चेंज केले आहे. या प्रोफाईल स्टेट्समध्ये त्यांनी ट्रोलर्ससाठी खास मॅसेज लिहिला आहे.‘लोक समजण्यापलीकडे आहेत. माझ्या लाइफस्टाईलची खिल्ली उडवली गेली, माझा अपमान केला गेला तर मी तुम्हाला ब्लॉक करेल. आता हे तुमच्यावर अवलंबून आहे,’ अशा शब्दांत ऋषी कपूर यांनी हेटर्सला तंबी दिली आहे.आता या तंबीचा ट्रोलर्सवर किती परिणाम होईल हे आम्हाला ठाऊक नाही. पण हो, अद्यापही ऋषी कपूर यांना ट्रोल करण्याचा ‘सिलसिला’ थांबलेला नाही.
सध्या देशात लॉकडॉऊन आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळे लोक आपआपल्या घरात कैद आहेत. अशात ऋषी कपूर सतत कोरोनाबद्दल लिहित आहेत. आपल्या एका ट्विटमध्ये त्यांनी देशात आणीबाणी लागू करायला पाहिजे, असे लिहिले होते.
अन्य एका ट्विटमध्ये त्यांनी लॉकडाऊनच्या काळात सकाळी 9 ते 2 दारूला परवानगी द्यावी, अशी मागणी केली होती. सद्यस्थितीत राज्य सरकारला दारू विक्रीतून मिळणा-या महसूलाची प्रचंड गरज आहे. त्यामुळे दारूला कायदेशीर मान्यता द्या, असे ऋषी यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले होते. यावरून ऋषी कपूर प्रचंड ट्रोल झालेत. अनेकांनी त्यांची खिल्ली उडवली होती.