बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर (Rishi Kapoor) यांचा आज पहिला स्मृतिदिन (Death Anniversary) आहे. आज त्यांच्या निधनाला एक वर्ष झाले. ऋषी कपूर कपूर बिनधास्त स्वभावासाठी ओळखले जायचे. ऋषी कपूर यांची मुलगी रिद्धिमा वडिलांचे अंतिम दर्शनही घेऊ शकली नव्हती. गेल्यावर्षीदेखील लॉकडाऊन असल्यामुळे रिद्धिमा तिच्या सासरी दिल्लीत अडकली होती. याच कारणामुळे या बाप-लेकीची अखेरची भेटही झाली नाही.ऋषी कपूर यांचे त्यांच्या लेकीवर जीवापाड प्रेम होतं. रिद्धिमा कपूर साहनीसाठी देखील तिचे वडील सुपरहीरोपेक्षा कमी नव्हते. वडिलांच्या पहिल्या स्मृतिदिनी रिद्धिमाने वडिलांसोबतचा दोन फोटोंचा कोलाज शेअर करत इमोशनल पोस्ट शेअर केली आहे.
रिद्धिमाने पोस्टमध्ये लिहिले की, 'काश! मी पुन्हा एकदा तुम्हाला मुश्क म्हणताना ऐकू शकले असते तर... आम्ही सतत तुमच्याबद्दल विचार करतो, तुमच्याबद्दल बोलतो. तुम्हाला विसरलेलो नाहीत, कधीच विसरू शकणार नाही. तुम्ही आमच्या हृदयाजवळ आहात. आपली पुन्हा भेट होत नाही,तोपर्यंत तुम्ही आमच्या आयुष्याचे मार्गदर्शक म्हणूनच आमच्यासोबत असाल... लव्ह यू आॅलवेल,’ अशी पोस्ट तिने शेअर केली आहे.
१९७० साली प्रदर्शित ‘मेरा नाम जोकर’मध्ये छोटीशी भूमिका करणाऱ्या ऋषी कपूर यांनी १९७३ साली ‘बॉबी’ या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून सुमारे चार दशके सिनेइंडस्ट्रीत कार्यरत असलेल्या ऋषी कपूर यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये आघाडीच्या भूमिका बजावल्या आहेत.