बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर गेल्या अनेक महिन्यांपासून अमेरिकेत वैद्यकीय उपचार घेत होते. पण ते मुंबईत परतले असून त्यांच्या कमबॅकमुळे त्यांचे चाहते प्रचंड खूश आहेत. ते आता कोणत्या चित्रपटात झळकणार याची त्यांचे चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत.
ऋषी कपूर आणि त्यांची पत्नी नितू सिंग कपूर यांची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडते. त्यांच्या नात्याविषयी त्यांनी काही वर्षांपूर्वी स्टारडस्टला दिलेल्या मुलाखतीत अनेक गोष्टी सांगितल्या होत्या. त्यांनी कधीच त्यांच्या पत्नीला फसवले नाही असे त्यांनी या मुलाखतीत सांगितले होते. एवढेच नव्हे तर त्यांच्या वडिलांच्या अन्य महिलांसोबत असलेल्या नात्याचा त्यांच्या कुटुंबियांवर कशाप्रकारे परिणाम होत होता याविषयी देखील सांगितले होते.
ऋषी कपूर यांनी सांगितले होते की, मी माझ्या कुटुंबियांकडून अनेक गोष्टी शिकलो आहे. कोणत्याही अपयशावर मात कशी करायची हे देखील मला माझ्या कुटुंबियातील लोकांनीच शिकवले. त्याचसोबत कुटुंबियात सुरू असलेल्या काही समस्यांनी मला एक माणूस म्हणून घडवले. माझ्या वडिलांचे काही अन्य महिलांसोबत संबंध होते आणि त्या सगळ्याचा परिणाम माझ्या आईवर व्हायचा. तिने खूप काही सहन केले. तिचे दुःख मी नेहमीच पाहिले. या सगळ्यामुळे मी खूप स्ट्राँग व्यक्ती झालो. आमच्या आयुष्यातील याच काळाने मला खंबीर बनवले, या काळाने मला खूप काही शिकवले. मी लहान असताना घरात ज्या काही गोष्टी घडत होत्या, त्यामुळे मी खूपच कमी वयात मॅच्युअर्ड झालो. मी ज्या परिस्थितीतून गेलो, त्याच परिस्थितीतून माझी मुले जाऊ नये यासाठी मी नेहमीच प्रयत्न केले. ज्या गोष्टींचा माझ्या कुटुंबावर परिणाम होईल, अशा गोष्टींपासून मी दूर राहाणेच पसंत केले. पण तरीही मी एका गोष्टीपासून दूर राहू शकलो नाही. ती गोष्ट म्हणजे दारू. बहुधा माझे वडील खूप प्यायचे. त्यामुळे मी देखील त्या व्यसनाच्या अधीन गेलो.
ऋषी कपूर यांची आई कृष्णा राज कपूर यांचे निधन काही महिन्यांपूर्वी झाले. त्यावेळी ऋषी उपचारासाठी अमेरिकेत असल्याने त्यांना आईचे अंतिम दर्शन घेता आले नव्हते.