ऋषी कपूर यांचा आज वाढदिवस असून 4 सप्टेंबर 1952 ला बॉलिवूडमधील सगळ्यात प्रसिद्ध अशा कपूर कुटुंबात त्यांचा जन्म झाला. राज कपूर यांच्या या मुलाने बॉलिवूडमध्ये त्याच्या अभिनयाने एक वेगळी ओळख निर्माण केली. त्यांनी एक अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते म्हणून बॉलिवूडमध्ये आपले एक स्थान निर्माण केले आहे. त्यांना त्यांच्या मेरा नाम जोकर या पहिल्याच चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांनी आजवर बॉबी, लव्ह आज कल, अग्निपथ, खेल खेल में, प्रेमरोग, रफू चक्कर, सरगम, कर्ज, नगीना, चांदनी, बोल राधा बोल यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. ते आजही त्यांच्या विविध भूमिकांद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. त्यांच्या अभिनयासाठी त्यांना आजवर अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
ऋषी कपूर यांना काही महिन्यांपूर्वी कॅन्सरचे निदान झाले होते. ते आता या आजारातून बरे होत असून ते सध्या न्यूयॉर्कमध्ये आहेत. या आजारपणात त्यांची पत्नी नीतू सिंग या त्यांच्या पाठिशा कायम उभ्या राहिल्या. ऋषी कपूर यांनी नितू सिंग यांच्यासोबत 1980 मध्ये लग्न केले. बॉलिवूडमधील सगळ्याच क्यूट कपलपैकी एक त्यांना मानले जाते. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये देखील एकत्र काम केले आहे.
ऋषी कपूर यांनी त्यांच्या खुल्लम खुल्ला या पुस्तकात खुलासा केला आहे की, नीतू सिंग यांच्याआधी त्यांचे अफेअर एका पारसी मुलीसोबत होते. या मुलीचे नाव यासमीन मेहता असून बॉबी या चित्रपटाच्या आधी त्यांनी तिला डेट केले होते. बॉबी या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान डिम्पल आणि ऋषी यांच्या अफेअरच्या चर्चांना ऊत आले होते. डिम्पल यांचे राजेश खन्ना यांच्यासोबत लग्न झाल्याने या चर्चांचा त्यांच्यावर काहीही परिणाम झाला नाही. पण याच कारणामुळे ऋषी आणि यासमीन यांच्याच गैरसमज निर्माण होऊन त्यांचे ब्रेकअप झाले. यासमीनने त्यांच्या आयुष्यात परत यावे यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले. पण याचा काहीही परिणाम झाला नाही.