अनेक यादगार सिनेमे देणारे, अनेक यादगार भूमिका साकारणारे बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे आज सकाळी पाऊणे नऊच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी सर्वप्रथम महानायक अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर शेअर केली. यानंतर कपूर कुटुंबाने अधिकृत स्टेटमेंट जारी करत, त्यांच्या निधनाचे वृत्त दिले.ऋषी कपूर यांनी शेकडो चित्रपटांतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. अखेरच्या क्षणापर्यंत चाहत्यांचे मनोरंजन करण्याचा ध्यास त्यांनी पूर्ण केला. होय, कपूर कुटुंबाने जारी केलेल्या स्टेटमेंटनुसार, अखेरचा श्वास घेईपर्यंत रूग्णालयातील डॉक्टर आणि नर्सेसचे मनोरंजन करत होते. काल रात्री उशीरा ऋषी कपूर यांची प्रकृती अचानक बिघडली. यानंतर त्यांना मुंबईच्या आयएसटी रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार करणा-या डॉक्टर व नर्सेनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषी कपूर शेवटपर्यंत हसतखेळत बोलत होते. विनोद करत होते. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी सगळ्यांचे मनोरंजन केले.
गेल्या दोन वर्षांपासून ऋषी कपूर यांच्यावर कॅन्सरचे उपचार सुरु होते. या उपचारादरम्यानही ऋषी कपूर यांच्या चेह-यावर कधीच निराशा, ताण, वेदना दिसल्या नाहीत. खिलाडूवृत्तीने आणि अतिशय धैर्याने ते या आजाराला सामोरे गेलेत.
कुटुंब, मित्रांसोबत मौजमस्ती आणि वेगवेगळे खाद्यपदार्थ चाखणे व चित्रपट पाहणे एवढेच अखेरच्या दिवसांत त्यांनी केले. आजारपणात त्यांना भेटणारा प्रत्येक जण त्यांच्यातील उत्साह, त्यांच्यातील उर्मी पाहून अवाक् होत. जगभरातील चाहत्यांनी भरभरून दिलेल्या प्रेमामुळे ते गद्गद होत. जगातून गेल्यावर मला लोकांनी माझ्या डोळ्यांतील अश्रूंसाठी नाही तर माझ्या चेह-यावरच्या हास्यासाठी आठवणीत ठेवावे, हे जणू त्यांनी मनाशी पक्के ठरवले होते आणि शेवटच्या श्वासापर्यंत त्यांच्या चेह-यावर तेच हास्य होते.