संदीप आडनाईककोल्हापूर : सदाबहार अभिनेता ऋषिकपूर यांचे कोल्हापूर आणि पन्हाळ्याशी जिव्हाळ्याचे नाते राहिलेले आहे. १९७७ मध्ये फुल खिले है गुलशन गुलशन आणि मे १९९४ मध्ये प्रेमग्रंथ या चित्रपटाच्या चित्रिकरणप्रसंगी कोल्हापूरमध्ये आले होते.भालजी पेंढारकर यांच्यामुळे कपूर परिवाराचा कोल्हापूरशी संबंध आला. भालजींच्या महारथी कर्ण आणि वाल्मिकी या चित्रपटासाठी ऋषिकपूर यांचे आजोबा पृथ्वीराज कपूर कोल्हापूरात वास्तव्याला होते. वाल्मिकी चित्रपटात पृथ्वीराज कपूर प्रमुख भूमिकेत होते. त्यावेळी कोल्हापूर सिनेटोनच्या या चित्रपटाच्या चित्रिकरणप्रसंगी राज कपूर, शशी कपूर आणि शम्मी कपूर त्यांच्या आईसोबत कोल्हापूर परिसरातच रहात होते. राज कपूर यांना या चित्रपटात नारदाची भूमिका सर्वप्रथम भालजींनी दिली. या भूमिकेसाठी मिळालेल्या मानधनातूनच राज कपूर यांनी चेंबूरला जागा खरेदी केली, त्यातूनच आर.के.स्टुडिओ उभारला हा इतिहास आहे.राज कपूर यांच्या कोल्हापूर आणि परिसराशी संबंधित अनेक आठवणी सांगितल्या जातात. त्यामुळे ऋषिकपूर हे जेव्हा सर्वप्रथम १९७६-७७ मध्ये फुल खिले हैं गुलशन-गुलशन या चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी कोल्हापूरात आले होते, तेव्हाही कोल्हापूरबद्दल ते आत्मियतेने बोलले होते. कोल्हापूर, भोगावती रोडवरील कांडगाव, पन्हाळा या परिसरात या चित्रपटाचे बरेचसे चित्रिकरण करण्यात आले होते. या चित्रपटात त्यांच्यासोबत मौसमी चटर्जी, मिथुन चक्रवर्ती, अमजद खान, अशोक कुमार आदी सहकलाकार होते.१९९४ मध्ये प्रेमग्रंथ या चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी ऋषि कपूर पुन्हा कोल्हापूरात आले होते. पन्हाळा, कोल्हापूर आणि गगन बावडा येथे या चित्रपटातील काही प्रसंगांचे चित्रिकरण झाले होते. माधुरी दिक्षितसोबत दिल देने की रुत आयी हे त्यांच्यावर येथे चित्रीत झालेले गाणे खूप गाजले होते. रणधीर कपूर, ऋषि कपूर आणि राजीव कपूर या तिघांनी या चित्रपटाची निर्मिती केली होती, तर राजीव कपूर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.नीतू सिंग यांचा आला होता फोनपन्हाळा येथे फुल खिले है गुलशन गुलशन या चित्रपटाच्या चित्रिकरणप्रसंगी ऋषिकपूर यांची मुलाखत घेण्यासाठी मुंबईहून भारती प्रधान या ज्येष्ठ सिनेपत्रकार रात्रभर प्रवास करुन पन्हाळ्यावर आल्या होत्या. ऋषिकपूरसोबत अमजद खान आणि बोनी कपूरही होते. जेवणाप्रसंगी काही अज्ञात लोकांनी त्यांच्याशी गैरवर्तणुक केल्याची आणि अमजद आणि बोनी कपूर यांनी त्यांना दूर नेल्याची आठवण भारती प्रधान यांनी २0१६ मध्ये प्रसिध्द झालेल्या एका ब्लॉगवर दिली आहे. ऋषि कपूर यांच्यासोबत नीतू सिंग त्यावेळी डेट करत होत्या आणि जेवणाच्या टेबलवरच नीतू सिंग यांचा फोन आल्याची आठवणही प्रधान यांनी दिली आहे. जेवणानंतर परत फोन करेन, असा निरोप ऋषि कपूर यांनी नीतू सिंग यांना द्यायला सांगितल्याचेही प्रधान यांनी लिहिले आहे.
अशोक कुमार आणि अमजद खान यांनी सावकाराची भूमिका केली होती. या चित्रपटातील एका दृश्य कांडगाव येथील शेतात चित्रीत केले होते. शेत आणि जनावरे जाळण्याचा हा प्रसंग होता.अरुण भोसले-चोपदार,माजी सदस्य, चित्रपट महामंडळ, कोल्हापूर