ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 6 - मेरा नाम जोकर चित्रपटातून फिल्म इंडस्ट्रित पदार्पण केलेले अभिनेते ऋषी कपूर यांचे बॉबी, प्रेमरोग, सरगम, हिना, चांदणी, कर्ज आदी चित्रपट खूप गाजले. 2016 मधील कपूर अँड सन्स या सिनेमातील त्यांच्या भूमिकेचे कौतुक झाले. अलीकडच्या काळात ते आपल्या बिनधास्त आणि वादग्रस्त ट्विटमुळे सतत चर्चेत असतात. सोशल मीडियावर सतत अॅक्टीव्ह असणाऱ्या ऋषी कपूर यांच्या ट्विटवरुन अनेकदा वाद निर्माण झाला तसेच ते चर्चेचा मुद्दा ठरले आहेत. वर्षाच्या सुरुवातीला खुल्लम खुल्ला या आत्मकथनातून नवनवीन गुपीत उघड झाली होती, त्यानंतर आज त्यांनी ट्विटर महिलेला दिलेल्या प्रत्युत्तरामध्ये अपमानास्पद आणि अश्लील ट्विट करत नव्या वादाला तोंड फोडले आहे.
ऋषी कपूर यांनी काल रात्री ट्विटरवर शॉर्ट क्विजमध्ये चाहत्यांना एक प्रश्न विचारला होता. माझ्या आणि करण जोहरमध्ये साम्य अथवा एकसारखं काय आहे? या प्रश्नावर त्यांना अनेक उत्तरे मिळाली. एका चाहत्याने उत्तर देताना म्हटले की, दोघांनीही वडिलांचं नाव मुलाला ठेवलं आहे. तर एका महिलेनं त्यांच्या प्रश्नावर उत्तर देताना म्हटले की, सेलिब्रिटी असूनही मूर्खासारखे अंतर ठेवता, हे दोघामध्ये साम्य आहे. त्यानंतर ऋषी कपूर यांना राग अनावर झाला आणि त्या महिलेला उत्तर देताना अपमानास्पद आणि अश्लील ट्विट केलं. यानंतर ऋषी कपूर यांनी अनेक वादग्रस्त आणि मजेदार ट्विट करत प्रत्येकाला त्यांच्याच भाषेत उत्तरे देण्यास सुरुवात केली. एका चाहत्याला तर त्यांनी चक्क ब्लॉकही केलं.
यापूर्वीही ऋषी कपूर अडकले होते वादात
- बिग बी त्यांच्या सिनेमातील सहकलाकारांना योग्य श्रेय देत नाही, असे ‘खुल्लम खुल्ला’ या आत्मकथनातून ऋषी कपूर यांनी अमिताभ बच्चन यांच्याविषयी खंत बोलून दाखवली. अमिताभ बच्चन हे सत्तरच्या दशकात खूप मोठे स्टार होते. त्याकाळात अॅक्शन चित्रपटांची चलती होती. त्यामुळे स्वभाविकपणे चित्रपटात अमिताभ यांना सर्वात चांगले डॉयलॉग, भूमिका मिळायची. सिनेमात इतर कलाकारांना मात्र त्यांच्या तुलनते कमजोर भूमिका दिल्या जायच्या.
- दाऊदसोबत चहापान केल्याचा खुलासा त्यांनी स्वत:हून केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. १९८८ मध्ये दुबईत एका कार्यक्र मात सहभागी होण्यासाठी गेले असताना ऋषी कपूर यांची दाऊदशी भेट झाली होती. यावेळी दोघांमध्ये चार तास चर्चा झाली. या भेटीचा किस्सा ऋषी कपूर यांनी रोचक शब्दात वर्णिला आहे.
- ऋषी कपूर यांनी हॉलिवूड अभिनेत्री किम कर्दाशियन हिला टार्गेट करत वादग्रस्त ट्विट केले होते. किम आणि कांद्याचे पोते असा एक फोटो पोस्ट करत किमची तुलना कांद्याच्या पोत्याची तुलना केली होती.
- ऋषी कपूर यांनी गांधी परिवारावर केलेल्या ट्विटमुळेदेखील वाद निर्माण झाला होता. ऋषी कपूर यांनी गांधी परिवारावर अप्रत्यक्षरित्या टीका करत देशामधील अनेक ठिकाणांना नेहरु - गांधी यांचं नाव देण्यावरुन नाराजी व्यक्त केली होती. ऋषी कपूर यांनी सलग ट्विट करत इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ, राजीव गांधी फिल्म सिटी नाव देण्यावरुन प्रश्न उपस्थित केले. देशाच्या संपत्तीचं गांधी कुटुंबांच्या नावे नामकरण करणं काँग्रेसने थांबवाव. वांद्रे - वरळी सी लिंकला लता मंगेशकर किंवा जेआरडी टाटा यांचं नाव देऊ शकतो. ही तुमची खासगी संपत्ती आहे का ?', असं ट्विट ऋषी कपूर यांनी केलं होतं.
- हिट अँड रनप्रकरणात पाच वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा झाल्यानंतर सलमान खानला बॉलीवूडकडून पाठिंबा मिळत असतानाच ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांनी त्याच्या समर्थकांना फटकारले आहे. एखाद्या दिवशी हुकूमशहा होता आले असते तर गायक अभिजीतला नपूंसक बनवले असे वादग्रस्त मत ऋषी कपूर यांनी मांडले आहे.