ऋषी कपूर यांनी 1970 मध्ये वडील राज कपूर यांच्या 'मेरा नाम जोकर' या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. या सिनेमात त्यांनी त्यांच्या वडिलांच्या बालपणीची भूमिका वठवली होती. 1973 मध्ये आलेल्या 'बॉबी' या सिनेमातून त्यांनी मुख्य अभिनेता म्हणून बॉलिवूडमध्ये एंट्री केली होती. त्यांच्या कारकीर्दीत, त्यांनी 1973-2000 पर्यंत सुमारे 92 सिनेमांमध्ये रोमँटिक हीरो म्हणून काम केले. सोलो लीड अभिनेता म्हणून त्यांनी 51 सिनेमांमध्ये काम केले.
सगळ्याच पिढ्यांमध्ये त्यांचा चाहतावर्ग आहे. ‘बॉबी’ सिनेमानंतर त्यांना अनेक चित्रपटांच्या ऑफर येऊ लागल्या. त्यांनी ‘लैला मजनू’, ‘सरगम’, ‘प्रेम रोग’, ‘कर्ज’, ‘नागिन’, ‘हनिमून’, ‘हीना’, ‘बोल राधा बोल’, ‘कभी कभी’, ‘बदलते रिश्ते’, ‘आप के दीवाने’, ‘सागर’, ‘अजूबा’, ‘हम तुम’, ‘फना’, ‘नमस्ते लंडन’, ‘लव आज कल’, ‘दो दुनी चार’ अशा अनेक सिनेमांमध्ये काम केले.
अनेक सुपरहिट देणारे ऋषी कपूर यांचा काही 2018 मध्ये १०२ नॉट आऊट सिनेमाही प्रदर्शित झाला. रिअल आयुष्याप्रमाणे ऑनस्क्रीन अमिताभ आणि ऋषी कपूर यांचा यारानाही रसिकांची पसंती मिळवून गेला. सिनेमात ऋषी कपूर यांनी अमिताभ बच्चन यांच्या मुलाची भूमिका साकारली होती. आणि हाच सिनेमा ऋषी कपूर यांच्यासाठी अखेरचा सिनेमा ठरला. रिल लाईफमध्ये १०२ वर्ष पूर्ण केलेला ऋषी कपूरने ख-या आयुष्यात मात्र वयाच्या ६७ व्या वर्षीच अकाली एक्झिट घेतली. ऋषी कपूर यांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण बॉलिवूड शोकाकुल झाले आहे.
ऋषी कपूर यांना 2018 मध्ये कॅन्सरचे निदान झाले होते. ते अमेरिकेत उपचारासाठी गेले. न्यूयॉर्कमध्ये 11 महिने 11 दिवस उपचार घेतल्यानंतर गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये ते भारतात परतले होते. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची पत्नी नीतू होत्या. तर मुलगा रणबीर त्यांना अनेक वेळा भेटण्यासाठी न्यूयॉर्कला गेला होता. काही दिवसांपूर्वी ऋषी यांनी एका मुलाखतीत म्हटले होते की, "आता मला बरे वाटत आहे. आणि कोणतेही काम करू शकतो. पुन्हा अभिनय कधी सुरू करण्याचा विचार करतोय. पण लोकांना आता माझे काम आवडेल की नाही हे माहित नाही.