Join us

रितेश देशमुख आणि कैलास खेरच्या हस्ते 'डोक्याला शॉट'चा ट्रेलर आणि म्युझिक लाँच

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2019 6:30 AM

अनेक दिवसांपासून सगळयांना प्रतीक्षा असणाऱ्या 'डोक्याला शॉट' या हटके नाव असलेल्या चित्रपटाचा ग्रँड ट्रेलर नुकताच अभिनेता रितेश देशमुख यांच्या हस्ते लाँच करण्यात आला.

अनेक दिवसांपासून सगळयांना प्रतीक्षा असणाऱ्या 'डोक्याला शॉट' या हटके नाव असलेल्या चित्रपटाचा ग्रँड ट्रेलर नुकताच अभिनेता रितेश देशमुख यांच्या हस्ते लाँच करण्यात आला. मुंबईत संपन्न झालेल्या या सोहळ्यात रितेश देशमुख यांच्यासह कैलाश खेर देखील उपस्थित होते. या कार्यक्रमात ट्रेलर सोबत 'डोक्याला शॉट' चित्रपटाच्या संगीताचेही कैलास खेर यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.  

नावाप्रमाणे अगदी हटके घटना चार मित्रांच्या आयुष्यात घडते आणि चालू होतो 'डोक्याला शॉट'. सुव्रत जोशी, रोहित हळदीकर, ओंकार गोवर्धन, गणेश पंडित या चार जीवलग मित्रांच्या एका धमाल गोंधळाची गोष्ट असलेला' डोक्याला शॉट' हा चित्रपट मनोरंजनाने परिपूर्ण असे एक 'पॅकेज' असणार आहे.या चित्रपटाबद्दल बोलताना रितेश देशमुख म्हणाला की," मी हा चित्रपट पहिला आणि पाहताना माझे फक्त खुर्चीतून खाली पडायचे बाकी होते. इतका मी हसत होतो. खूप सुंदर चित्रपट आहे. आणि मैत्रीवर आधारित आहे. आपण आयुष्यात एकच गोष्ट खरी कमावतो आणि ती म्हणजे 'मैत्री'. आपली खरी मैत्री आपल्यासोबत शेवटपर्यंत असते. त्यामुळे अशा या वेगळ्या तरीही जिव्हाळ्याच्या विषयावर असलेला हा सिनेमा तुम्ही नक्की बघा. मी शाश्वती देतो, की तुमची चित्रपटगृहातून बाहेर पडताना नक्कीच निराशा होणार नाही." कैलास खेर हे देखील या सोहळयाला आवर्जून हजर होते. कैलाशजींनी या चित्रपटात एक गाणे देखील गायले आहे. त्या अनुभवाबद्दल ते म्हणाले, " मला तर 'डोक्याला शॉट' या शब्दाचा सुरुवातीला अर्थही माहित नव्हता तरी मी या सिनेमात गाणे गाण्यास होकार दिला, कारण या चित्रपटाची कथा मला आवडली. त्यानिमित्ताने मला पुन्हा मराठीत काम करण्याची संधी मिळत होती आणि ही संधी मला गमवायची नसल्याने मी होकार दिला".  'डोक्याला शॉट' या चित्रपटाची निर्मिती उत्तुंग ठाकूर यांनी केली आहे. 'न्यूड', 'बालक पालक', 'रेगे', 'येल्लो' अशा विविध विषयांवर आधारित अप्रतिम चित्रपटांमध्ये सहाय्यक दिग्दर्शकाची भूमिका यशस्वीरीत्या पार पडल्यानंतर शिवकुमार पार्थसारथी हे 'डोक्याला शॉट' चित्रपटातून दिग्दर्शनात पाऊल टाकत आहे. याशिवाय गुरु ठाकूर आणि चेतन सैंदाणे यांनी या चित्रपटातील गाणी लिहली आहे. त्यांच्या सुंदर शब्दांना अमितराज, श्रीकांत-अनिता यांनी संगीतबद्ध केले आहे. तर मिका सिंग, कैलास खेर या दिगज्ज गायकांनी त्या गाण्यांना आपला आवाज दिला आहे. प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका फुलवा खामकर यांनी चित्रपटाचे नृत्य दिग्दर्शन केले आहे. या  चित्रपटाला रोहन-विनायक यांनी पार्श्वसंगीत दिले आहे तर सुमन साहू यांनी या सिनेमाचे छायाचित्रण केले आहे. 

टॅग्स :रितेश देशमुखप्राजक्ता माळीकैलाश खेर