बॉलिवूडचा किंगखान शाहरूख खान (Shah Rukh Khan) याचे जगभर चाहते आहेत. अगदी बॉलिवूडमधीलही अनेक जण शाहरूखचे फॅन आहेत. रितेश देशमुख (Riteish Deshmukh) हाही शाहरूखचा जबरा फॅन आहे. होय, शाहरूखची प्रत्येक गोष्ट रितेश फॉलो करतो. विश्वास बसत नसेल तर ही बातमी तुम्ही वाचायलाच हवी.तमन्ना भाटियासोबतच्या गप्पांमध्ये रितेशने शाहरूखबद्दलचा एक मस्त किस्सा सांगितला. शाहरूखसोबतची त्याची भेट आणि या पहिल्या भेटीमुळे त्याला जडलेली सवय याबद्दल त्याने खुलासा केला. होय, शाहरूखमुळे आपल्याला एक सवय जडलीये आणि आता ही सवय सुटता सुटत नाहीये, असं रितेश म्हणाला.
रितेश व तमन्नाचा हा व्हिडीओ नेटफ्लिक्सने शेअर केला आहे. यात रितेश सांगतो, ‘एकदा शाहरूख माझ्या वडिलांना भेटायला माझ्या घरी आला होता. ती त्याची आणि माझी पहिली भेट. शाहरूखला माझ्यापुढे पाहून मी कमालीचा एक्साइटेड झालो होतो. कारण मी त्याचा खूप मोठा फॅन आहे. थोड्याफार गप्पा टप्पा झाल्यानंतर मी शाहरूखला चहा, कॉफी काय घेणार, अशी विचारणा केली. शाहरूखने काहीही नको म्हणत, नम्रपणे नकार दिला. पण मी त्याला आग्रह केल्यावर ठीक आहे, ब्लॅक कॉफी चालेल, असं तो म्हणाला. त्याआधी मी कधीही ब्लॅक कॉफीचं नाव सुद्धा ऐकलं नव्हतं. मी आमच्या शेफकडे गेलो आणि त्याला ब्लॅक कॉफी बनवायला सांगितलं. पण त्यालाही ब्लॅक कॉफी कशी बनवतात, काहीही माहिती नव्हतं. साहेब ती कशी बनवायची? असं त्याने मला विचारलं. मला पण ते माहित नाही, असं मी त्यावर म्हणालो. नंतर त्याने कोणाच्या तरी मदतीने ब्लॅक कॉफी बनवली. त्यादिवशी ब्लॅक कॉफी काय चीज आहे, हे मला कळलं. उशीरा कळलं, पण तेव्हापासून मी ती प्यायला सुरूवात केली आणि आज ब्लॅक कॉफीशी माझं नातं अफेअरसारखं झालंय...’
रितेशच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर, लवकरच तो ‘प्लान ए और प्लान बी’ या सिनेमात दिसणार आहे. शशांक घोषने दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात रितेश पहिल्यांदा तमन्ना भाटियासोबत स्क्रिन शेअर करणार आहे. या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर नुकताच रिलीज झाला. हा चित्रपट 30 सप्टेंबरला नेटफ्लिक्सवर रिलीज होतोय.