सध्या जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असताना भारतातही या व्हायरसचा विळखा घट्ट होत आहे. दिवसागणिक भारतात कोरोना संक्रमित रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. देशात सुरुवातीला २१ दिवसांचा लॉकडाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केला होता. आता तो वाढवून ३ मे पर्यंत करण्यात आला आहे. महाराष्ट्रात तर कोरोना व्हायरसचे रुग्ण मोठ्या संख्येत असून सगळ्यात जास्त रुग्ण हे मुंबई आणि पुणे या महानगरात आहेत. पण असे असले तरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे मंत्रीमंडळ अतिशय मेहनत घेत असून या संकटाचा सामना करत आहेत. प्रत्येक नागरिकाला चांगली आरोग्यसेवा मिळावी यासाठी ते प्रयत्न करत आहेत.
उद्धव ठाकरे यांच्या या कार्यासाठी सामान्य लोकांपासून सगळेच सेलिब्रेटी त्यांचे कौतुक करत आहेत. आता अभिनेता रितेश देशमुखने सोशल मीडियाद्वारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले आहे. त्याने त्याच्या ट्वीटमध्ये लिहिले आहे की, सध्या आपण सगळे एका वेगळ्याच संकटाचा सामना करत आहोत... आपण सगळे केवळ कोरोना व्हायरसचा सामना करतोय असे नाही तर त्यासोबतच लोकांमध्ये भीती, नैराश्य आणि अनिश्चितादेखील आहे. पण या सगळ्यात माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्याशी दररोज संवाद साधत असून आपल्या मनात असलेल्या शंकांचं निरासन करत आहेत, आपल्यातील भीती दूर करत आहेत यासाठी त्यांचे करावे तितके कौतुक कमी आहे.
माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेशी सतत संवाद साधत असून तुम्ही घाबरू नका... आपण सगळे या संकटावर मिळून मात करणार आहोत असा विश्वास लोकांमध्ये निर्माण करत आहेत. त्यांच्या या सकारात्मकतेमुळे लोकांना देखील धीर मिळत आहे.