बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) सोशल मीडियावर किती सक्रिय असतो, हे नव्यानं सांगायला नकोच. टिकटॉक बंद होण्याआधीचं तर विचारू नका. गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्ये रितेश ‘टिक टॉक’ (TikTok) या अॅपवर आला होता आणि यानंतर त्याच्या मजेशीर व्हिडीओंनी याठिकाणी नुसता धुमाकूळ घातला होता. त्याच्यासोबतीला त्याची पत्नी जिनिलिया हिच्या व्हिडीओंनी देखील धम्माल केली होती. पण अचानक मोदी सरकारने ‘टिकटॉक’वर बंदी घातली आणि जणू रितेश बेरोजगार झाला. होय, खुद्द रितेशने यावर मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे. ‘टिक टॉक बंद झाल्यानंतर जणू मी बेरोजगार झालो होतो. परंतु, इन्स्टाग्रामवरील रील्स फीचर आलं आणि माझं निभावलं. मला पुन्हा काम मिळालं,’ असे रितेश म्हणाला.
‘मॅशबेल इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला की, ‘लॉकडाऊनचा काळ सर्वांसाठी कठीण होता. अशात आम्ही सगळ्यांच्या चेह-यावर हसू आणण्याचा विचार केला आणि टिक टॉक व्हिडीओ बनवण्यास सुरुवात केली होती. परंतु, भारतात ‘टिक टॉक’ बंद करण्यात आलं आणि त्यानंतर जणू मी आता बेरोजगार झालोय, असं मला वाटू लागलं होतं. देवा आता काय करू मी, असा प्रश्न मी स्वत:लाच विचारायचो. पण काही दिवसांनंतर इन्स्टाग्रामवर रिल्स आलं आणि मला काम मिळालं. चला रिल्स तयार करू, असं मी ठरवलं.’रितेश देशमुख आणि जेनिलिया डिसूजा हे बॉलिवूडचे क्युट कपल आहे. या कपलच्या अदांवर चाहते अक्षरश: फिदा आहेत. होय, म्हणूनच दोघांचा व्हिडीओ आला रे आला की, तो व्हायरल होतो. इतकेच काय, आणखी असे व्हिडीओ बनवा, म्हणून लोक या जोडप्याकडे मागणी करतात.हिंदी चित्रपटसृष्टीतील क्युट कपल म्हणून रितेश आणि जेनेलिया या जोडीकडे पाहिले जाते. ‘तुझे मेरी कसम’ या सिनेमातून दोघांनी बॉलिवूडमध्ये पहिले पाऊल ठेवले आणि याच सिनेमातून दोघं आयुष्यभराचे जोडीदार बनले.