Join us

आरक्षणावर काय म्हणाले होते विलासराव देशमुख? रितेश देशमुखकडून वडिलांचा "तो" व्हिडीओ शेअर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2023 3:51 PM

रितेश देशमुखने वडील दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचाआरक्षणासंदर्भातील जुना व्हिडीओ पोस्ट केला आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण तापलं आहे.  सरकार आणि विरोधी पक्ष यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु झालेत. आरक्षणावर राजकीय नेत्यांसह बॉलिवूड सेलिब्रिटी आपले मत मांडत आहेत. अशातचं आता अभिनेता रितेश देशमुख याने आपले वडील दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा आरक्षणासंदर्भातील जुना व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये विलासराव देशमुख यांनी आरक्षणावर आपले विचार मांडले आहेत.

 विलासरावांचे हे भाषण दहा वर्ष जुनं आहे.  ज्यात विलासराव देशमुख म्हणाले होते, "आज आरक्षणावरील चर्चा मुंडे साहेब आपण केलीत.  कुण्या समाजाला द्यावं, देऊ नये याबद्दल आपला विरोध नाही. जेव्हा जातीनिहाय आरक्षण देण्याचा प्रश्न येतो, तेव्हा आरक्षणाचा संघर्ष भविष्यातही राहणार. म्हणून आर्थिक निकषावर आधारित जर आपण सर्वांना सवलती देण्याचा विचार केला तर लोक आपली स्वतःची जात शोधण्याचा प्रयत्न करणार नाही". 

"आज प्रत्येकजण माझी जात काय आणि त्यानुसार मला सवलती कशा मिळतील या शोधात आहे. त्यामुळे आरक्षण हे आर्थिक निकषावर दिले गेले पाहिजे. हे केवळ एका राजकीय पक्षाला वाटून चालणार नाही तर सर्व पक्षांमध्ये याविषयावर मतऐक्य निर्माण होणे गरजेचे आहे. असे झाले तर भविष्यातील संघर्ष टाळता येतील", असे विलासराव देशमुख म्हणाले होते. यावेळी व्यासपीठावर  भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आर आर पाटील, शिवसेना नेते मनोहर जोशी आणि ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर उपस्थित होते.

विलासरावांचा हा व्हिडीओ आमदार सत्यजीत तांबे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला होता. त्यांच्या अकाऊंटवरुन रितेश देशमुखने हा व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केला आहे.

मनोज जरांगे-पाटील हे मागील नऊ दिवसांपासून जालन्यात मराठा आरक्षणासाठी उपोषण करत आहेत. दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खालावताना दिसत आहे. सध्या त्यांना सलाईन लावली आहे. डॉक्टरांकडून सातत्याने त्यांच्या प्रकृतीची काळजी घेतली जात आहे. दरम्यान, १ सप्टेंबर रोजी पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी विरोध झाल्यानंतर लाठीचार्ज करण्यात आला. तसेच पोलिसांकडून हवेतगोळीबार करण्यात आला होता. शांततेत सुरू झालेल्या या उपोषणाला हिंसक वळण मिळाल्याचे चित्र आहे. या प्रकारानंतर राज्यभरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. 

टॅग्स :रितेश देशमुखमराठा आरक्षण