मुंबई – अभिनेता रितेश देशमुख(Riteish Deshmukh) आणि त्याची पत्नी जेनेलिया डिसूझा(Genelia D'Souza) शुक्रवारी अभिनेते अमिताभ बच्चन(Amitabh Bachchan) यांच्या ‘कोन बनेगा करोडपती’(KBC 13) शोमध्ये विशेष पाहुणे बनून सहभागी झाले होते. या एपिसोडमध्ये रितेश देशमुख आणि जेनेलिया यांनी त्यांच्या लग्नाबद्दल पहिल्यांदाच खुलासा केला आहे.
एपिसोडवेळी या रितेश-जेनेलिया जोडीने इंडस्ट्रीमधील त्यांचा अनुभव शेअर केला. यावेळी जेनेलियाने अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम केलेल्या पहिल्या जाहिरातीची आठवण बोलून दाखवली. जेनेलिया म्हणाली की, अमिताभ बच्चन यांच्यासोबत मी पहिली जाहिरात केली होती त्यावेळच्या शूटींगबद्दल जेनेलियाने किस्सा सांगितला. शूटींग सुरू असताना बिग बी अमिताभ बच्चन यांच्या क्लोज अप शॉट घेण्यात येत होता. तेव्हा अमिताभ बच्चन यांनी स्वत:ऐवजी माझा क्लोज अप शॉट घेण्याचा आग्रह केला असं जेनेलियाने सांगितले.
रितेश देशमुख आणि जेनेलियाच्या लग्नाचं बिग बी कनेक्शन काय?
त्यानंतर रितेश देशमुख म्हणाला की, जेनेलियासोबत माझ्या लग्नाचं श्रेय बिग बी अमिताभ बच्चन यांना जातं. जर त्या शूटींगवेळी जेनेलियाचा क्लोज अप शॉट दिला नसता तर कदाचित आमचं लग्न झालं नसतं. त्या क्लोज अपमुळेच जेनेलिया आणि मी पहिला सिनेमा सोबत केला. हे सगळं त्या एका क्लोज अप शॉटमुळे झालं होतं जे तुमच्या आग्रहामुळेच झाल्याचं रितेशनं अमिताभ बच्चन यांना सांगितले.
KBC च्या सेटवर जेनेलियाला रितेशनं केलं प्रपोज
बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय कपल म्हणजे रितेश आणि जेनेलिया. ऑनस्क्रीनवर एकत्र झळकणाऱ्या या जोडीची ऑफस्क्रीन केमिस्ट्रीदेखील चाहत्यांना विशेष आवडते. केबीसीच्या या शोमध्ये सहभागी झाल्यावर रितेशनं सेटवरच जेनेलियाला रोमॅन्टिक प्रपोज केले. रितेश केबीसीच्या मंचावर जेनिलियासोबत रोमॅण्टिक सीन करत असल्याचं दिसून आलं. बिग बींच्या अमर अकबर एंथनी चित्रपटातील एक डायलॉग बोलत रितेशने जेनेलियाला प्रपोज केलं.
रितेश जेनेलिया पहिल्यांदा कधी भेटले?
रितेश आणि जेनेलिया यांची पहिली भेट २००३ मध्ये दोघांचा पहिला सिनेमा ‘तुझे मेरी कसम’च्या शुटींगवेळी झाली. अनेक वर्ष रितेश-जेनेलिया एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर ३ फेब्रुवारी २०१२ रोजी दोघंही लग्नाच्या पवित्र बंधनात अडकले. रितेश-जेनेलियाला राहिल आणि रियान नावाची दोन मुलं आहेत.