ड्रग्स प्रकरणात रिया चक्रवर्ती, सॅम्युअल मिरांडा आणि दीपेश सावंतला बुधवारी ७ ऑक्टोबरला कोर्टाने जामीन दिला होता. त्यानंतर पहिल्यांदाच रिया चक्रवर्ती आज सांताक्रुझ पोलीस स्टेशनमध्ये स्पॉट झाली. त्यावेळी ती मीडियाच्या कॅमेऱ्यात कैद झाली. पण रियाने मीडियाला पाहून कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. बुधवारी रियाचा भाऊ शौविकचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळून लावला होता.
जामीन अर्जात दिलेल्या अटींनुसार, रिया चक्रवर्तीला १० दिवसांपर्यंत आपल्या घराच्या जवळील पोलीस स्टेशनमध्ये सकाळी ११ ते संध्याकाळी ५ पर्यंत आपली हजेरी लावायची आहे. यासोबतच रियाचा पासपोर्टदेखील जप्त केला आहे आणि सोबतच रियाला मुंबई बाहेर जाण्यासाठीदेखील परवानगी घ्यावी लागेल. रियाला पुढील १० दिवसांपर्यंत पोलीस स्टेशनमध्ये हजेरी लावायची आहे.
उच्च न्यायालयाची निरीक्षणेरिया चक्रवर्तीला जामीन देताना मुंबई उच्च न्यायालयाने आपल्या ऑर्डरमध्ये सांगितले की, रियाची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. तरुणांपुढे उदाहरण ठेवण्यास सेलिब्रिटी व आदर्श असलेल्या व्यक्तींना कठोर शिक्षा देणे मान्य नाही. सर्व समान आहेत. रिया ड्रग्ज विक्रेत्यांमधील एक भाग नाही. तिने विकत घेतलेले ड्रग्ज अन्य तिसऱ्या व्यक्तीला आर्थिक फायद्यासाठी विकले नाहीत. ती जामिनावर सुटल्यावर गुन्हा करणार नाही, यावर विश्वास ठेवू शकतो. एनडीपीएस कायद्याच्या कलम २७ (ए), २४, १९ अंतर्गत ती दोषी नसल्याचे दिसते. रियाची एक लाख रुपये तर अन्य दोघांची प्रत्येकी ५० हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर सुटका केली.
रियाची आई झाली भावूकरियाला जामीन मिळाल्याचे कळताच, तिची आई संध्या चक्रवर्ती भावूक झाली. ‘परमेश्वर आहे,’ असे म्हणत ती रडू लागली. गेल्या तीन महिन्यांचा काळ रियाच्या कुटुंबासाठी खूप कठीण होता. अद्यापही त्यांचा हा कठीण काळ संपलेला नाही. कारण रिया तुरुंगातून बाहेर आली असली तरी रियाचा भाऊ शौविक अद्यापही तुरुंगात आहे. संध्या चक्रवर्ती यांनी पहिल्यांदा या संपूर्ण प्रकरणावर मौन सोडत प्रतिक्रिया दिली. रियाने काय काय सोसले, हे त्यांनी सांगितले.