Join us

Rocketry Movie Review: खऱ्या देशभक्तीचं दर्शन घडवणारा 'रॉकेट्री - द नंबी इफेक्ट', वाचा कसा आहे सिनेमा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2022 3:51 PM

Rocketry - The Nambi Effect Movie Review केवळ सीमेवर लढतात तेच नॅशनल हिरो नसतात, तर समाजात वावरतानाही देशसेवेसाठी जीवन वेचणारेही खरे नायक असतात. 'रॉकेट्री - द नंबी इफेक्ट' चित्रपटातही अशाच एका देशभक्त वैज्ञानिकाची कथा पहायला मिळते.

कलाकार : आर. माधवन, सिमरन, रजत कपूर, गुलशन ग्रोव्हर, राजन रविंद्रनाथन, सॅम मोहन, विन्सेन्ट रियाटो, श्याम रेंगानाथन, मिशा घोषाल, मुरलीधरन, दिनेश प्रभाकर, मोहन रमणलेखक-दिग्दर्शक : आर. माधवननिर्माता : सरीता माधवन, आर. माधवन, वर्गीस मूलान, विजय मूलानकालावधी : २ तास ३७ मिनिटे स्टार - साडे तीन स्टारचित्रपट परीक्षण - संजय घावरे 

'भोगले जे दु:ख त्याला सुख म्हणावे लागले...' असंच काहीसं या चित्रपटाचं वर्णन करता येईल. केवळ सीमेवर लढतात तेच नॅशनल हिरो नसतात, तर समाजात वावरतानाही देशसेवेसाठी जीवन वेचणारेही खरे नायक असतात. या चित्रपटातही अशाच एका देशभक्त वैज्ञानिकाची कथा पहायला मिळते. आपण जे पाच वर्षांमध्ये कमवतो तेवढा दर महिना पगाराच्या नासाच्या ऑफरवर लाथ मारून इस्रोद्वारे देशासाठी कार्य करणाऱ्या नंबी नारायणन यांची ही कथा आहे. आजवर अभिनय केल्यानंतर दिग्दर्शकाच्या रूपात समोर येताना आर. माधवननं भावनिक करणारी कथा निवडल्यावर दिग्दर्शन करताना कुठेही अतिरंजीतपणा न करता वास्तव वाटावं असं चित्र सादर केलं आहे.

अफाट बुद्धिमत्ता लाभलेले नंबी नारायण हे एक असे भारतीय वैज्ञानिक आहेत, ज्यांच्या बुद्धिमत्तेची गरज नासासारख्या जागतिक पातळीवरील आघाडीच्या संस्थेलाही भासली होती. नंबी यांची मुलाखत घ्यायला शाहरुख खान सुरुवात करतो आणि टप्प्याटप्प्यानं त्यांचं जीवन समोर येऊ लागतं. भारत जेव्हा अवकाशात झेप घेण्याचं स्वप्नही पाहू शकत नव्हता, तेव्हापासून नंबी यांनी रॉकेट्रीच्या माध्यमातून मंगळावर पोहोचण्याचा ध्यास घेतला होता. कोणतंही विकसित तंत्रज्ञान अवगत नसतात, कोणतीही यंत्रसामुग्री उपलब्ध नसताना, सॅटेलाईटच्या माध्यमातून अवकाशात झेप घेण्याचं देशाचं बजेट नसताना नंबी यांनी आपल्या तल्लख बुद्धिमत्तेचा वापर करून विकास इंजिन बनवलं अणि देशोदेशी हिंडून, प्रसंगी जीवावर उदार होऊन धरतीवरून अवकाषात झेप घेण्याचं तंत्रज्ञान भारतात आणलं आणि त्या बदल्यात त्यांना आपण काय दिलं याची कहाणी या चित्रपटात आहे.

लेखन-दिग्दर्शन : या चित्रपटाच्या दिग्दर्शनासोबतच लेखनही माधवननं केलं आहे. अतिशयोक्तीचा मोह आवरत जे घडलं ते जसंच्या तसं दाखवण्याचा प्रामाणिक प्रयत्न माधवननं केला आहे. चित्रपटाचं लेखन अत्यंत काळजीपूर्वक करण्यात आलं आहे. प्रत्येक मुद्दा अगदी बारकाईनं दाखवण्यात आला आहे. डिटेलिंग छान आहे. चित्रपटाच्या सुरुवातीला १९५४चा काळ पहायला मिळतो. नंबी यांची इस्रोमध्ये असिस्टंट म्हणून झालेली नेमणूक, नासा फेलोशीप मिळवून प्रिन्सेटॅान युनिव्हर्सिटीत दाखल होणं, प्रोफेसर लुईगी क्रोको यांच्याकडून शिक्षण घेता यावं यासाठी केलेलं घरकाम, ५२ साईंटिस्टना घेऊन फ्रान्समध्ये घेतलेलं टेक्नॅालॅाजी प्रशिक्षण, संपूर्ण जगाचे डोळे दिपावणाऱ्या विकास इंजिनची यशस्वी निर्मिती, रशियाकडून फॅब्रिकेट फोर क्रिजेनीक इंजिन्स मिळवताना अमेरिकेनं आणलेला दबाव, अमेरिकेच्या डोळ्यांत धूळफेक करून कराची मार्गे भारतात आणलेली यंत्रसामुग्री आणि त्यानंतर नंबी यांच्यावर झालेले देशद्रोहाचे आरोप असा या चित्रपटाचा ग्राफ आहे. या चित्रपटातील बरीच दृश्ये भावूक करतात आणि अंतर्मुख होऊन विचार करायला लावतात. हा चित्रपट वास्तवदर्शी असून एका सच्चा देशभक्ताची कहाणी सांगणारा असल्यानं मसालापटांच्या चाहत्यांसाठी यात काही नाही. नंबी यांना न्यायालयानं निर्दोष मुक्त केलं असलं तरी ते दोषी नव्हते मग दोषी कोण होते, त्यांच्यावर कारवाई झाली का, भारतासारख्या देशात एका सच्चा वैज्ञानिकाला गुन्हेगाराप्रमाणं थर्ड डिग्री टॅार्चर का केलं जातं, त्यांच्या फॅमिलीला इतकं दु:ख का भोगावं लागतं, अद्यापही त्यांना पूर्ण नुकसान भरपाई का मिळाली नाही या प्रश्नांची उत्तरं आजही अनुत्तरीत आहेत. चित्रपटातील गाणी कथेच्या प्रवाहाशी एकरूप होणारी आहेत. 

अभिनय : नंबी नारायणन यांच्या भूमिकेत माधवन अगदी सहजपणे वावरताना दिसतो. शाहरुखसमोर बसून मुलाखत देण्यापासून वरिष्ठांना आपलं म्हणणं पटवून देत प्रचंड संघर्ष करून तंत्रज्ञान व सामग्री भारतात आणण्यापर्यंत सर्वच दृश्यांमध्ये माधवननं कमाल काम केलं आहे. पत्नीच्या रूपात सिमरनची माधवनला सुरेख साथ लाभली आहे. शाहरुख खाननंही मुलाखतकाराची भूमिका चोख बजावली आहे. महान वैज्ञानिक विक्रम साराभाईंच्या भूमिकेत रजत कपूरनं उत्तम अभिनय केला आहे. एपीजे अब्दुल कलाम यांच्या भूमिकेत गुलशन ग्रोव्हर असल्याचं ओळखताही येत नाही. राजन रविंद्रनाथननं साकारलेला परम आणि सॅम मोहनच्या रूपातील उन्नी चांगला जमून आला आहे. विन्सेन्ट रियाटो यांनी क्रोकोची भूमिका साकारली आहे. याशिवाय श्याम रेंगानाथन, मिशा घोषाल, मुरलीधरन, दिनेश प्रभाकर, मोहन रमण आदींनी चांगली साथ दिली आहे.

सकारात्मक बाजू : आजवर कधीही समोर न आलेली नंबी नारायणन या देशभक्त वैज्ञानिकाची वास्तव कथा अनेकांना प्रेरणा देणारी ठरणारी असून खऱ्या देशभक्तीचं दर्शन घडवणारी आहे.

नकारात्मक बाजू : चित्रपटातील मध्यंतरापूर्वीचा बराचसा भाग इंग्रजीमध्ये आहे. त्यामुळं इंग्रजी न समजणारे प्रेक्षक कंटाळतील. या दृश्यांमध्ये इंग्रजीसोबतच हिंदी सबटायटल्सही देण्याची गरज होती.

थोडक्यात : मसालेपट मनोरंजन करतात हे खरं असलं तरी अशा प्रकारचे चित्रपट पुढची पिढी घडवण्यासाठी प्रेरक ठरतात हे कोणीही अमान्य करणार नाही. एखाद्या देशभक्ताला काय भोगावं लागू शकतं याची कल्पनाही नसणाऱ्या सर्वांनीच एकदा तरी हा चित्रपट पहावा.

टॅग्स :रॉकेट्री : द नंबी इफेक्टआर.माधवनशाहरुख खानगुलशन ग्रोव्हर