ज्येष्ठ मराठी अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी (Rohini Hattangady) यांची नुकतीच एक मुलाखत प्रसिद्ध झाली आहे. मराठी आणि हिंदी अशा दोन्ही सिनेसृष्टीत त्यांनी अभिनयाचा ठसा उमटवला आहे. मराठी नाटक असो किंवा मालिका किंवा चित्रपट त्या सगळीकडेच सक्रिय आहेत. तर हिंदीतही त्यांनी कायम लक्षात राहणाऱ्या अनेक भूमिका केल्या आहेत. नुकतेच त्यांनी मुलाखतीत अभिनेता रणवीर सिंगविषयी (Ranveer Singh) वक्तव्य केलं आहे.
रोहिणी हट्टंगडी म्हणाल्या, 'रणवीर सिंग आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांच्यात मला रणबीर कपूर जास्त आवडतो. कारण त्याची सार्वजनिक ठिकाणची वागणूक नीट असते. तर रणवीर सिंग मात्र चारचौघात बरा वागत नाही. एक अभिनेता म्हणून तो खूप चांगला आहे पण मला रणबीर कपूरच जास्त आवडतो. रणवीर सिंग ज्याप्रकारे बाहेर वागतो ते तरुण मुलं बघत असतात आणि त्यांच्या दृष्टीने ते अजिबातच योग्य नाही. त्याच्या वयाच्या व्यक्तींना ते शोभतही नाही. तो एक पब्लिक फिगर आहे मग त्याची वागणूकही त्याप्रमाणेच असली पाहिजे.'
आपल्या एकंदर कारकिर्दीविषयी त्या म्हणाल्या, 'मला सतत आईच्या भूमिकाच ऑफर होत होत्या. त्यामुळे मी अग्निपथ सिनेमाच्या आधी आईची भूमिका करायचं नाही असंच ठरवलं होतं. मध्ये मी अनेक सिनेमांना नकारही दिला. माझ्या मॅनेजरनेही काळजी व्यक्त केली होती. पण जेव्हा अग्निपथ ची ऑफर मिळाली तेव्हा मी म्हटलं की आधी मी कथा ऐकणार आणि मग निर्णय घेणार. यानंतर मी अर्धीच कथा ऐकून लगेच होकार दिला. कारण सिनेमात सर्वच भूमिकांना महत्व होतं. अगदी कमिश्नरपासून ते नायकाच्या बहिणीपर्यंत सगळ्यांचाच रोल होता. म्हणून आईची भूमिका करायचं नाही असं ठरवलं असतानाही मी ही भूमिका स्वीकारली.'
रोहिणी हट्टंगडी सध्या रंगभूमीवर परतल्या आहेत. 'चारचौघी' या नाटकात त्या व्यस्त आहेत. यामध्ये मुक्ता बर्वे, कादंबरी कदम आणि पर्ण पेठेही मुख्य भूमिकेत आहेत.