‘सारेगमप लिटिल चॅम्प’ या स्पर्धेमुळे रोहित राऊत हे नाव महाराष्ट्रातील घराघरांत पोहोचलं. रोहितने ‘वजनदार’, ‘अवताराची गोष्ट’, ‘दुनियारी’, ‘प्यार वाली लव्ह स्टोरी’, ‘कान्हा’, ‘फुंतरु, ‘वन वे तिकिट, ‘बे दुणे साडेचार’, ‘का रे दुरावा’ आदी चित्रपट आणि काही मालिकांसाठीही गाणी गायली आहेत. एक गायक म्हणून रोहितने आज मराठी चित्रपटसृष्टीत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. पण आता गायनासोबतच रोहित आणखी एका क्षेत्रात आपले भाग्य आजमावणार आहे.
रोहित राऊत आता एका चित्रपटात आपल्याला संगीत दिग्दर्शकाच्या भूमिकेत दिसणार आहे. स्वप्निल जोशीचा मोगरा फुलला हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनाची धुरा रोहितने सांभाळली असल्याचे म्हटले जात आहे. रोहितच्या या नव्या इनिंगसाठी त्याचे फॅन्स आतुरतेने वाट पाहात आहेत.
रोहित राऊतने अगदी लहान वयापासून त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. 'सारेगमपा' लिटल चॅम्पस या कार्यक्रमात तो स्पर्धक म्हणून झळकला होता. त्याचा आवाज प्रेक्षकांना खूपच आवडला होता. याच कार्यक्रमामुळे तो प्रकाशझोतात आला. अखेरच्या पाच स्पर्धकांपर्यंत त्याने मजल मारली होती. त्यानंतर तो हिंदी सारेगमामध्येदेखील झळकला. या कार्यक्रमाद्वारेदेखील त्याने प्रेक्षकांची मने जिंकली. या दोन्ही रिअॅलिटी शोमुळे रोहितला मराठी इंडस्ट्रीत चांगलाच ब्रेक मिळाला. गायनामध्ये यश मिळाल्यानंतर रोहित राऊत सूत्रसंचालनाकडे वळला. त्याने संगीत सम्राट या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले होते.
‘मोगरा फुलला’ या चित्रपटामध्ये स्वप्नील जोशी सोबतच साई शक्ती आनंद, नीना कुलकर्णी, चंद्रकांत कुलकर्णी, संदीप पाठक, सुहिता थत्ते, आनंद इंगळे, समिधा गुरु, विघ्नेश जोशी, संयोगिता भावे, दीप्ती भागवत, प्राची जोशी, विक्रम गायकवाड, प्रसाद लिमये, हर्षा गुप्ते, सोनम निशाणदार, सिद्धीरूपा करमरकर, माधुरी भारती, सुप्रीत कदम, अनुराधा राजाध्यक्ष आणि आदित्य देशमुख या आघाडीच्या कलाकारांच्याही भूमिका आहेत. प्रख्यात दिग्दर्शिका श्रावणी देवधर ह्या बऱ्याच वर्षांनी ‘मोगरा फुलला’च्या माध्यमातून दिग्दर्शनाकडे परत वळल्या आहेत. हा चित्रपट १४ जूनला प्रदर्शित होणार आहे.