अभिनेता रोहित रॉय आणि मानसी जोशी रॉय त्यांचा आगामी शो ‘लॉक्ड इन लव’द्वारे हंगामा प्लेवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. हे दोन्ही कलाकार मागील 25 वर्षांपासून खऱ्या आयुष्यात नवरा-बायको असून एकत्र काम करत आहेत. त्यांनी लॉकडाउन दरम्यान या कार्यक्रमाचे चित्रीकरण केले. या शोमध्ये 5 अभिनव लघुकथांचा संग्रह असून त्यात प्रेमाच्या विविध छटा दिसणार आहेत. या शो’च्या प्रत्येक कथेत रोहित आणि मानसी वेगवेगळ्या व्यक्तिरेखांसोबत प्रेक्षकांच्या भेटीला येतील. त्याशिवाय, प्रत्येक लघुपटाचे दिग्दर्शन रोहितने केले आहे. लॉकडाउनमध्ये नवीन शो’ची निर्मिती करण्याविषयी रोहित रॉय म्हणाला की, “लॉकडाऊन सुरू झाल्यावर सगळे कसे होणार कोणालाच ठाऊक नव्हते. अनिश्चिततेचे सावट होते. जसे दिवस पुढे सरकू लागले आणि चर्चा सुरू केल्या. कल्पना सुचू लागल्या. बऱ्याच लोकांचा समावेश न करता कंटेट तयार होण्यास मदत झाली. या अनुभवाने आम्हाला नवीन गोष्टी शिकण्याची संधी दिली आणि असे वातावरण दिले ज्याचा यापूर्वी आम्ही अनुभव घेतला नव्हता. ‘लॉक्ड इन लव’ शो पूर्ण केल्याचा आम्हाला आनंद वाटतो. या भावनिक कथा प्रेक्षकांना नक्की आवडतील ही आशा वाटते.”
रोहित रॉय आणि मानसी जोशी रॉय हे खऱ्या आयुष्यातील पती-पत्नी दिसणार या शोमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2020 4:50 PM