नवी दिल्ली: कोरोना संकटानंतर आता चित्रपटगृहे खुली करण्यात आली असून, रोहित शेट्टीचा (Rohit Shetty) सूर्यवंशी (Sooryavanshi) चित्रपट प्रदर्शित करण्यात आला आहे. अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) यांची प्रमुख भूमिका असलेला सूर्यवंशी हा चित्रपट आताच्या घडीला बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असून, आतापर्यंत १५० कोटींहून अधिकची कमाई केली आहे. मात्र, या चित्रपटात मुस्लिम व्हिलन असल्यावरून आता नवा वाद निर्माण झाला आहे. या वादावर रोहित शेट्टीने पलटवार केला असून, सदर मुद्दा उपस्थित करणाऱ्यांनाच प्रतिप्रश्न केला आहे.
रोहित शेट्टीने क्विंटला दिलेल्या मुलाखतीत अनेक विषयांवर स्पष्टपणे भाष्य केले आहे. सूर्यवंशी चित्रपटात मुस्लिम खलनायक दाखवल्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. यासंदर्भात रोहित शेट्टीला या मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला. याआधीच्या माझ्या चित्रपटांमध्ये हिंदू खलनायक दाखवले गेले तेव्हा हा प्रश्न का उपस्थित करण्यात आला नाही, असा प्रतिप्रश्न रोहित शेट्टीने केला आहे.
तेव्हा हा मुद्दा उपस्थित का झाला नाही
सूर्यवंशी चित्रपटात ‘चांगले मुस्लिम आणि वाईट मुस्लिम’ अशा दोन्ही बाजू दाखवल्या गेल्या आहेत, असे बोलले जात आहे. त्यावर बोलताना रोहित शेट्टी म्हणाला की, मी तुम्हाला विचारतो की, जयकांत शिर्के हिंदू होता आणि मराठी होता. तसेच दुसऱ्या सिनेमातही हिंदू व्हिलन होता. सिम्बामध्येही मराठी म्हणजेच हिंदू व्हिलन होता. या तीनही नकारात्मक भूमिका हिंदू होत्या. मग तेव्हा हा मुद्दा उपस्थित का झाला नाही, अशी विचारणा करत काही वृत्तामध्ये सूर्यवंशी चित्रपटात चांगले मुस्लिम आणि वाईट मुस्लिम अशी कथा दाखवण्यात आल्याचे सांगण्यात आले असून ते पूर्णपणे चुकीचे आहे. चित्रपट तयार करताना आम्ही असा काही विचारच करत नाही तर लोकं असा विचार का करतात? एखाद्या वाईट किंवा चांगल्या व्यक्तीचा त्याच्या जातीशी संबध लावला जाऊ नये, असे रोहित शेट्टीने म्हटले आहे.
दरम्यान, सूर्यवंशी चित्रपटाच्या कमाईचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. या चित्रपटात अक्षय कुमार आणि कतरिना कैफ यांच्यासह अजय देवगण आणि रणवीर सिंह यांच्याही भूमिका आहेत. एका रिपोर्टनुसार, अक्षय कुमारने सूर्यवंशी चित्रपटात काम करण्यासाठी मानधन म्हणून २५ कोटी तर, कतरिना कैफने १० कोटी रूपये मानधन घेतल्याचे सांगितले जात आहे. तर अजय देवगण आणि रणवीर सिंह यांनी या चित्रपटासाठी एकही रुपयाचे मानधन घेतलेले नाही. तर, जॅकी श्रॉफने १ कोटी तर जावेद जाफरीने ५० लाख रूपये मानधन घेतल्याचे सांगितले जात आहे.