छोट्या पडद्यावरील स्टंट रिएलिटी शो 'खतरों के खिलाडी'च्या दहाव्या सीझनमध्ये सगळ्यांना आपल्या खोडकर अदांनी हसविणारी अभिनेत्री तेजस्वी प्रकाश सगळ्यांना खूप भावते आहे. आता तर तिचं नशीब चांगलंच फळफळलं आहे. तिला या शोचा होस्ट व प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली आहे. ही खुशखबर खुद्द तिनेच सोशल मीडियावर दिली आहे.
तेजस्वी प्रकाश हिने इंस्टाग्रामवर तिच्या पहिल्या चित्रपटातील लूक शेअर करत लिहिले की, मला स्वतःचा अभिमान आणि नशीबवान असल्याचं वाटत आहे ती रोहित शेट्टी सर माझे मेंटॉर बनले आहे. हे आणखीन चांगलं तेव्हा झालं जेव्हा मला त्यांनी त्यांच्या पहिल्या मराठी सिनेमात मुख्य अभिनेत्री बनण्याची संधी दिली. स्कूल कॉलेज आणि लाइफ, या चित्रपटाची निर्मिती रोहित शेट्टी करत आहेत. विहान सूर्यवंशी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. हा चित्रपट यावर्षी उन्हाळ्यात प्रदर्शित होणार आहे.
तेजस्वीने या चित्रपटातील एक सीनचा फोटो देखील शेअर केला आहे. ज्यात ती तिच्या सहकलाकाराचा हात पकडल्याचं पहायला मिळतं आहे. तेजस्वीच्या या पोस्टवर तिचे चाहते लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
तेजस्वी प्रकाश टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ती संस्कार, स्वरागिनी, पहरेदार पिया की, रिश्ता लिखेंगे हम नया, सिलसिला बदलते रिश्तों, कर्ण संगिनीसारख्या मालिकेत झळकली आहे. तिने तिच्या अभिनयाच्या कारकीर्दीची सुरूवात मालिका 2612 मधून केली होती. सध्या ती कलर्स वाहिनीवरील रिएलिटी शो खतरों के खिलाडीमध्ये स्टंट करताना पहायला मिळते आहे.
तेजस्वीचा हा पहिला चित्रपट आणि तोही मराठीत. त्यामुळे तिला कसा रिस्पॉन्स मिळतो हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.