मुंबईवर झालेल्या २६/११च्या हल्ल्यातील मुख्य आरोपी तहव्वूर राणा (tahawwur rana) याचे अमेरिकेतून गुरुवारी भारतात प्रत्यार्पण करण्यात आले. राणाला घेऊन आलेले अमेरिकेचे गल्फस्ट्रीम जी ५५० हे विमान दिल्लीच्या पालम टेक्निकल एअरपोर्टवर उतरले. भारतात उतरताच राष्ट्रीय तपास यंत्रणेने त्याला अटक करुन दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टमध्ये सुनावणीसाठी घेऊन गेले. याप्रकरणी प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टीने (rohit shetty) पोस्ट लिहून पंतप्रधान मोदींचे (pm modi) आभार मानले आहेत.
रोहित शेट्टी काय म्हणाला
तहव्वूर राणाला भारतात आणल्यानंतर रोहित शेट्टीने एक पोस्ट लिहिली. या पोस्टमध्ये तहव्वूर राणाला अटक केल्याचा फोटो दिसतोय. या पोस्टखाली रोहित शेट्टीने कॅप्शन लिहिलंय की, 'भारत विसरला नाही. भारताने वाट पाहिली. पंतप्रधान मोदींनी याप्रकरणी न्याय दिला. २६/११ चा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला अमेरिकेतून प्रत्यार्पण केल्यानंतर दिल्लीत आणल्यावर त्याला NIA द्वारे अटक करण्यात आली. भारतावर झालेल्या विध्वंसक आतंकवादी हल्ल्यापैकी एक असलेल्या हल्ल्यात सहभागी असल्यामुळे राणाला आता सुनावणीला सामोरं जावं लागणार आहे.; अशाप्रकारे रोहित शेट्टीने पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये रोहितने #2611Attacks आणि #Newindia हे हॅशटॅग वापरले आहेत.
तहव्वूर राणाला १८ दिवसांची पोलीस कोठडी
२६/११ चा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला भारतात आणल्यावर त्याच्यावर कोर्टात सुनवाई झाली. त्यानंतर दिल्ली राज्य कायदेशीर सेवा प्राधिकरणाचे तहव्वुर राणाचे वकील म्हणाले, "एनआयएने २० दिवसांची पोलिस कोठडी मागितली होती. न्यायालयाने चौकशीसाठी १८ दिवसांची कोठडी दिली आहे. न्यायालयाने निर्देश दिले आहेत की त्यांना ताब्यात घेण्यापूर्वी आणि पुढील तारखेला हजर होण्यापूर्वी वैद्यकीय चाचण्या केल्या जातील आणि त्या दरम्यानच्या सर्व वैद्यकीय बाबी पूर्ण केल्या जातील. येत्या काळात तहव्वुर राणाला प्रत्यक्षरित्या न्यायालयासमोर हजर केले जाईल."