बॉलिवूडचा सुप्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी त्याच्या आगामी 'सिंघम अगेन' सिनेमामुळे चर्चेत आहे. सिंघम ३ नंतर त्याच्या सीक्वलची प्रेक्षकांना प्रतीक्षा होती. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. सिनेमाचा ४ मिनिटांचा ट्रेलर पाहून प्रेक्षकांची 'सिंघम अगेन'बाबतची उत्सुकता वाढली आहे. 'सिंघम अगेन' सिनेमाची कथा मराठमोळा लेखक क्षितीज पटवर्धनने लिहिली आहे. याबाबत त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.
'सिंघम अगेन' सिनेमाबाबत क्षितीजची पोस्ट
मुंबईत आल्यानंतर पाहिलेला पहिला हिंदी सिनेमा सिंघम. आज कथा आणि पटकथा लेखक म्हणून आलेला पहिला हिंदी सिनेमा सिंघम अगेन.
घरच्यांसारखी काळजी घेणाऱ्या रोहित सर आणि त्यांची सोन्यासारखी टीम यांना, माझ्या सर्व सहकारी लेखकांना आणि मला तिथपर्यंत पोचायला मदत करणाऱ्या मिखील आणि करण यांना, तुमच्याशिवाय हे शक्य नव्हतं.
समाधान आहे, त्याहून जास्त कृतज्ञता आहे. आजवर ज्यांनी हे स्वप्न पहायला साथ दिली त्या सगळ्यांना खूप खूप प्रेम. या दिवाळीला नक्की पहा. सिंघम अगेन तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात!!
क्षितीजच्या या पोस्टवर चाहत्यांबरोबरच कलाकारांनीही कमेंट केल्या आहेत. क्षितीजचं अभिनंदन करत हेमंत ढोमे, सिद्धार्थ जाधव, अभिजीत खांडकेकर, सोनाली कुलकर्णी, अमृता खानविलकर या सेलिब्रिटींनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
सिंघम अगेन सिनेमात कलाकारांचा फौजफाटा आहे. अजय देवगण, रणवीर सिंह, करीना कपूर, दीपिका पदुकोण, टायगर श्रॉफ, जॅकी श्रॉफ आणि अर्जुन कपूर यांची भूमिका आहे. तर अक्षय कुमारचा कॅमिओ आहे. मराठमोळा अभिनेता अंकित मोहनदेखील या सिनेमात झळकला आहे. 'सिंघम अगेन' दिवाळीच्या मुहुर्तावर १ नोव्हेंबर रोजी रिलीज होत आहे.