सध्या देशात आॅलिम्पिकचे वारे वाहू लागले आहेत. प्रत्येक भारतवासीयाला आता क्रिकेट व्यतिरिक्तदेखील अनेक खेळ जवळचे वाटू लागले आहेत. फक्त क्रिकेटच नाही, तर आता भारतवासी बॅडमिंटन, कुस्ती यांसारखे खेळदेखील टीव्हीसमोर बसून पाहू लागले आहेत. प्रेक्षकांची ही क्रेझ आणि त्याचबरोबर खेळाला अधिक प्रोत्साहन मिळावे, यासाठी प्रेक्षकांच्या लाडक्या अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि अमृता खानविलकर या दोघी लवकरच एका चित्रपटात झळकणार आहेत.हा चित्रपट खेळावर आधारित असेल. मराठी चित्रपटसृष्टीत असा पहिलाच प्रयत्न सुरेश पै यांचा असणार आहे. या चित्रपटात आम्ही दोघी एका खेळाडूच्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार असल्याचे अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने ‘लोकमत सीएनएक्स’शी संवाद साधताना सांगितले. सोनाली म्हणाली की, आपल्या देशात सध्या खेळाची काय परिस्थिती आहे ते सर्वांना माहीतच आहे. अशा परिस्थितीतही आज आॅलिम्पिकमध्ये महिला खेळाडूंनी केलेली कामगिरी ही मान उंचावणारी आहे. खेळावर आधारित असणारा चित्रपट करण्याची ही योग्य वेळ आहे. तसेच, मी आणि अमृता एकत्र येणार आहोत, ही गोष्टच आमच्यासाठी सुखद धक्का देणारी आहे. तर अमृता म्हणते की, माझी आणि सोनालीची या चित्रपटात अप्रतिम भूमिका आहेत. आम्ही दोघीदेखील हा चित्रपट करण्यास खूप उत्सुक आहोत. तसेच, सध्या खेळाचे प्रशिक्षणही घेत आहोत. हा एक वेगळा प्रयत्न करणार असल्याने खूप छान वाटते आहे. पण, सोनाली आणि अमृता नक्की कोणत्या खेळात पाहायला मिळणार, हे अजून गुलदस्तात आहे.
सोनाली आणि अमृता साकारणार खेळाडूची भूमिका
By admin | Published: August 22, 2016 2:24 AM