अभिनेता राम चरण म्हणजे दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील एक सुपरस्टार. RRR या चित्रपटामुळे त्याला वेगळी ओळख मिळाली. त्याचा चाहतावर्ग देखील खूप वाढला. आज जगभरात तयाचे करोडो फॅन्स आहेत. अशातच राम चरणच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेलाय.
मेलबर्नच्या १५ व्या इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये (IFFM) राम चरणला सन्मानित करण्यात येणार आहे. मेलबर्नमध्ये राम चरण भारतीय तिरंगा फडकावणार आहे. यंदा 15-25 ऑगस्ट 2024 पर्यंत हा चित्रपट महोत्सव चालणार आहे. ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांना भारतीय चित्रपट दाखवणे हे चित्रपट महोत्सवाचे उद्दिष्ट आहे. या महोत्सवात बॉलिवूड चित्रपट, माहितीपट, भारतातील प्रादेशिक भाषेतील चित्रपट दाखवले जातात.
या फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्याबद्दल राम चरण म्हणाला, 'भारतीय सिनेमाची विविधता आणि समृद्धता आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर साजरी करणाऱ्या मेलबर्नच्या इंडियन फिल्म फेस्टिव्हलचा भाग होण्याचा मला अत्यंत सन्मान वाटतोय. चित्रपट उद्योगाचे प्रतिनिधित्व करणे, जगभरातील चाहत्यांशी आणि सिनेफिल्सशी संपर्क साधणे हा एक विशेषाधिकार आहे. RRR चे यश आणि जगभरातून मिळालेले प्रेम प्रचंड आहे. हा क्षण मेलबर्नमधील प्रेक्षकांसोबत शेअर करताना मला खूप आनंद होत आहे. मेलबर्नमध्ये आपला राष्ट्रध्वज फडकवण्याच्या या मोठ्या संधीची मी वाट पाहतोय'.
राम चरण हा मेगास्टार चिरंजीवीचा मुलगा आहे. राम चरणने अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. फक्त अभिनेताच नाही तर तो एक निर्माता आणि उद्योजक देखील आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेतलेल्या कलाकारांपैकी एक असलेल्या राम चरणचा फोर्ब्स इंडियाच्या सेलिब्रिटी 100 यादीत 2013 पासून समावेश केला जातो. त्याने तीन फिल्मफेअर पुरस्कार आणि दोन नंदी पुरस्कार जिंकले आहेत. ब्लॉकबास्टर चित्रपट देऊन आणि अमाप संपत्ती असूनही राम चरण हा मातीशी जोडलेला आहे. राम चरणच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो लवकरच 'गेम चेंजर' या सिनेमात कियारा अडवाणीसोबत झळकणार आहे.