Join us

बलात्कार पीडितेची सलमान खानला 10 कोटी रुपयांची नोटीस

By admin | Published: June 27, 2016 6:00 PM

हिसार, हरयाणा - सामूहिक बलात्कार पीडितेने सलमान खानविरोधात 10 कोटी रुपयांची नोटीस बजावली आहे.

ऑनलाइन लोकमत
हिसार, हरयाणा - सामूहिक बलात्कार पीडितेने सलमान खानविरोधात 10 कोटी रुपयांची नोटीस बजावली आहे. सुलतान चित्रपटात काम करतानाचे अनुभव सांगताना सलमानने स्वत:ची तुलना बलात्कार झालेल्या महिलेसारखी झाल्याचे म्हटले होते. यावरून सलमानवर सर्व थरांतून टीकाही झाली होती. या तुलनेचा दाखला देत सदर पीडित महिलेने एकतर सलमानने जाहीर माफी मागावी अथवा मला 10 कोटी रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नोटिसीद्वारे केली आहे.
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, चार वर्षांपूर्वी या महिलेला 10 गुंडांनी पळवले व तिच्यावर बलात्कार केला. या धक्क्याने मुलीच्या हादरलेल्या वडिलांनी आत्महत्या केली. 10 पैकी 4 जणांना जन्मठेप झाली असून त्यांना फाशी यावी अशी मागणी पीडित महिलेने वरच्या कोर्टात केली आहे.
 
आता मला कमी बोलायला हवं - सलमान खान
 
या पार्श्वभूमीवर प्रचंड मानसिक तणावात असलेल्या या महिलेला सलमान खानच्या वक्तव्याने मानसिक धक्का बसला असून त्यासाठी सलमान जबाबदार असल्याचे नोटिसीमध्ये नमूद करण्यात आले आहे.
सदर वक्तव्य बेकायदेशीर आहे, तसेच ते घटनाविरोधी असल्याचा दावाही करण्यात आला असून त्यासाठी नुकसानभरपाई द्यावी लागेल असे मत या महिलेच्या वकिलाने व्यक्त केलं आहे. 
 
सलमान म्हणजे वादांचा ‘सुल्तान’
 
या महिलेनंही, सलमान खानसारखी व्यक्ती असं वक्तव्य करूच कसं शकते असा प्रश्न विचारल्याचं टाइम्सनं म्हटलं आहे. मी माझं सर्वस्व गमावलंय आणि अजून त्या धक्क्यातून बाहेर आलेली नाही. बलात्कार पीडितांना इतकं सहज हसण्यावारी कसं काय घेतलं जाऊ शकतं असा प्रश्न करत सलमाननं जाहीर माफी मागावी अशी मागणीही तिनं केली आहे. या देशाच्या कायद्याप्रमाणे सलमानवर कारवाई व्हावी यासाठीच आपण पुढाकार घेतला असून तेच नोटिसीमागचे कारण असल्याचे तिने नमूद केले आहे.
 
सलमान म्हणतो माझी परिस्थिती बलात्कार पिडीत महिलेसारखी, सोशल मिडियावर संताप