दक्षिणेकडील रसिकांसाठी अभिनयाचा देव म्हणजे रजनीकांत. त्यामुळे रजनीकांत यांचा सिनेमा कधी रसिकांच्या भेटीला येणार याचीच चाहते आतुरतेने वाट पाहात असतात. रुपेरी पडद्यावर रजनीकांत यांची अदाकारी पाहण्याचा आनंद हा काही औरच असतो. यावेळी ही तामिळ सिनेमांनी स्वतःचे एक वेगळेपण सिद्ध करण्यात यशस्वी ठरले आहे. याचे सारे श्रेय हे रजनीकांत यांनाच जाते. त्याला कारणही तसे खास आहे ते म्हणजे, मीडिया रिपोर्टनुसार रजनीकांत यांची प्रमुख भूमिका असलेला 'काला,' '2.2' आणि 'पेट्टा'या या तिन्ही सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला आहे.
रजनीकांत यांच्या सिनेमांनी 100 नाही 200 नाही तर तब्बल 1000 कोटींचा गल्ला जमवत आपले वेगळेपण सिद्ध केले आहे. म्हणजे गेल्या 7 महिन्यात त्यांच्या या तीनही सिनेमांनी इंडस्ट्रीला आतापर्यंत 1000 कोटींची कमाई करून दिली आहे. '2.2' सिनेमा -713 कोटी तर 'काला'ने 150 कोटी, नुकताच प्रदर्शित झालेला 'पेट्टा' सिनेमाने तर 250 कोटीची रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे आणि अजूनही त्याची घोडदौड सुरूच आहे.
त्यामुळे रजनीकांत असे पहिले दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतले कलाकार ठरले आहेत, ज्यांच्या तीनही सिनेमांनी गलेलठ्ठ कमाई करत एक वेगळाच रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. त्यामुळे आगामी काळात रजनीकांत रुपेरी पडद्यावर काय कमाल करणार हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.