Join us

अक्षय कुमारच्या सम्राट पृथ्वीराज चित्रपटावर मोहन भागवतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2022 11:15 AM

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्र्यांनी स्पेशल स्क्रिनिंगला हजेरी लावली होती.

नवी दिल्ली: देशात आताच्या घडीला ऐतिहासिक चित्रपटांची रेलचेल असल्याचे पाहायला मिळत आहे. यातच अभिनेता अक्षय कुमार याच्या सम्राट पृथ्वीराज चित्रपटाची देशभरात चर्चा सुरू आहे. या चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग नवी दिल्लीत करण्यात आले होते. याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनीही हजेरी लावली. यावेळी मोहन भागवत यांनी चित्रपटाचे कौतुक केले. 

आतापर्यंत आपण इतरांनी लिहिलेला आपला इतिहास वाचायचो. आता आपण भारताच्या दृष्टीकोनातून इतिहासाकडे पाहत आहोत. पृथ्वीराज चौहान, मोहम्मद घोरी यांची लढाई आपण आधीच वाचली आहे. पण ते कोणीतरी लिहिले होते आणि आपण ते वाचले आहे. भारताच्या भाषेत, प्रथमच भारतात लिहिलेली रचना पाहत आहोत. आता आपण भारताचा इतिहास आपल्या डोळ्यांनी पाहत आहोत आणि समजून घेत आहोत आणि हीच संधी आपल्याला मिळत आहे. त्याचा परिणाम देशाच्या भविष्यासाठी निश्चितच चांगला होईल. सर्व भारतीय भारताच्या सन्मानाचे रक्षण करण्यासाठी याच प्रकारे पराक्रमी होतील. मी सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो, या शब्दांत मोहन भागवत यांनी चित्रपटाचे कौतुक केले. 

भारतातील सांस्कृतिक युद्धांचे चित्रण करणारा हा चित्रपट

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, इतिहासाचा विद्यार्थी म्हणून भारतातील सांस्कृतिक युद्धांचे चित्रण करणारा हा चित्रपट पाहण्याचा आनंद घेतला. १३ वर्षांनंतर कुटुंबासह थिएटरमध्ये चित्रपट पाहात आहे. दिल्लीतील एका सिनेमागृहात त्यांनी कुटुंबातील सदस्य आणि अनेक केंद्रीय मंत्र्यांसह हा चित्रपट पाहिला. तसेच चित्रपटाच्या कलाकार आणि सदस्यांचे कौतुक केले होते.

दरम्यान, ज्ञानवापी मशिदीच्या वादासंदर्भात मोहन भागवत यांनी दोन्ही समाजाचे कान टोचले. ज्ञानवापी प्रकरण श्रद्धेचा विषय असून न्यायालय जो निर्णय देईल तो सर्वांनी मान्य केला पाहिजे. तसेच प्रत्येक मशिदीत ‘शिवलिंग’ शोधण्याची, तसंच दरदिवशी नवा वाद निर्माण करण्याची गरज नाही, असे मोहन भागवत म्हणाले होते.  

टॅग्स :मोहन भागवतराष्ट्रीय स्वयंसेवक संघअमित शाहअक्षय कुमारबॉलिवूड