टीव्ही अभिनेत्री रुबिना दिलैकचा पती आणि अभिनेता अभिनव शुक्लाला जीवेमारण्याची धमकी देण्यात आली आहे. एका सोशल मीडिया युजरने ऑनलाइन मेसेज करत अभिनवला धमकी दिली आहे. या मेसेजमध्ये त्याने स्वत:ला लॉरेन्स बिश्नोई गँगचा माणूस असल्याचं म्हटलं आहे. अभिनवने इन्स्टाग्राम स्टोरीमधून याबाबत माहिती दिली आहे.
अभिनव शुक्लाला जीवे मारण्याची धमकी
अभिनव शुक्लाला अंकित गुप्ता नावाच्या व्यक्तीकडून ही धमकी देण्यात आली आहे. या मेसेजमध्ये, "मी लॉरेन्स बिश्नोईचा माणूस आहे. तुझ्या घराचा पत्ता मला माहीत आहे. गोळी घालायला तुझ्या घरी येऊ का? जसं मी सलमान खानच्या घरी जाऊन गोळीबार केलेला...तसंच तुझ्या घरी एके ४७ घेऊन येईन आणि गोळी मारेन. तू किती वाजता शूटिंगला जातोस हे पण मला माहीत आहे. तुला ही शेवटची वॉर्निंग आहे. असीमला चुकीचं बोलण्याआधी तुझं नाव न्यूजमध्ये येईल. लॉरेन्स बिश्नोई भाई असिमसोबत आहेत. लॉरेन्स बिश्नोई झिंदाबाद", असं म्हटलं गेलं आहे.
नेमकं प्रकरण काय?
शिखर धवनच्या बॅटलग्राऊंड शोमध्ये असीम रियाझ आणि अभिषेक मल्हान यांच्यात वाद झाले होते. त्यांच्यात झालेलं भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडलेल्या रुबिनाला असीमने शिवीगाळ केली होती. त्यानंतर रुबिनाचा पती अभिनवने असीमला पोस्ट करत सुनावलं होतं. त्यामुळे त्याला आता जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. धमकी मिळाल्यानंतर अभिनवने पोलिसांत धाव घेतली आहे.