Join us

लग्नाच्या अफवेनं करिअर संपलं, बॉलिवूडच्या या अभिनेत्रीच्या मदतीला धावून आले होते दादा कोंडके अन् मग...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2023 12:23 PM

Dada Kondke : दादा कोंडके अभिनेते असण्यासोबत निर्माता आणि दिग्दर्शकही होते. आपल्या कारकिर्दीत त्यांनी अडचणीत आलेल्या अनेक नायिकांना त्यांनी मदतीचा हात दिला होता.

लोकप्रिय विनोदी अभिनेते दादा कोंडके (Dada Kondke) यांचा आजही मोठा चाहतावर्ग आहे. आपल्या सिनेमांच्या माध्यमातून त्यांनी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्यांच्या खळखळून हसवणाऱ्या विनोदी संवादांनी प्रेक्षकांचं चांगलचं मनोरंजन केलं आहे. दादा कोंडके अभिनेते असण्यासोबत निर्माता आणि दिग्दर्शकही होते. आपल्या कारकिर्दीत त्यांनी अडचणीत आलेल्या अनेक नायिकांना त्यांनी मदतीचा हात दिला होता. यात त्यांना मोलाची साथ लाभली होती ती स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची. अभिनेत्री मधू कांबिकर यांनाही अडचणीच्या काळात दादांनी मदत केली होती. तर काही हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांनाही दादांचा हा स्वभाव ठाऊक होता. त्याचमुळे प्रसिद्ध अभिनेत्री अरुणा इराणी (Aruna Irani) यांनीही दादांकडे मदतीचा हात मागितला होता. 

अभिनेत्री अरुणा इराणी या चित्रपटात नृत्यांगना म्हणून नावारूपाला आलेल्या होत्या. त्याकाळात मेहमूद यांच्यासोबत त्यांनी अनेक सिनेमात काम केले होते. पण मेहमूद सोबत काम करत असतानाच त्यांच्यात जवळीक वाढू लागली आणि दोघांनी लग्नही केले अशी अफवा पसरवण्यात आली. खरेतर मेहमूद यांचे त्यावेळी लग्न झालेले होते. पण मेहमूद यांना या अफवेमुळे खूप फायदा झाला होता. लग्नाच्या बातमीवर ते गप्प राहून होते त्यामुळे चित्रपटांच्या ऑफर त्यांना येऊ लागल्या होत्या. पण अरुणा इराणी यांच्याबाबतीत उलटं घडलं. 

लग्नाच्या अफवेमुळे अरुणा इराणी यांना कोणीच काम द्यायला पुढे येत नव्हते. कुठलाच प्रोड्युसर त्यांना अशा परिस्थितीत साइन करायला तयार होत नव्हता. एकतर लग्नाच्या बातमीमुळे आपले नाव बदनाम झालेच शिवाय कोणी हातालाही काम देईना म्हणून अरुणा इराणी हतबल झाल्या. शेवटी दादा कोंडके यांच्याकडे त्यांनी ही परिस्थिती बोलून दाखवली. मग त्यांच्या मदतीला दादा कोंडके धावून आले. आंधळा मारतोय डोळा या चित्रपटातील एका गाण्यात अरुणा इराणी यांना झळकण्याची संधी मिळाली. 

''दादांमुळे मी अभिनय क्षेत्रात कमबॅक करु शकले...''एका मुलाखतीत अरुणा इराणी यांनी याबद्दल सांगितले. त्या म्हणाल्या की, दोन अडीच वर्षाच्या प्रयत्नानंतर दादांनीच मला पुन्हा एकदा पडद्यावर येण्याची संधी उपलब्ध करून दिली. दादांचा हात पाठीशी होता त्यामुळे मी अभिनय क्षेत्रात कमबॅक करू शकले. त्यानंतर अरुणा इराणी यांनी मराठीत अनेक सिनेमात काम केले. लपवा छपवी, चंगु मंगु, भिंगरी, एक गाडी बाकी अनाडी, मितवा अशा चित्रपटात त्या महत्त्वाच्या भूमिकेत दिसल्या.

टॅग्स :दादा कोंडकेअरुणा इराणी