काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर #Banlipstic हा हॅशटॅग चांगलाच ट्रेंडमध्ये होता. अभिनेत्री तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) पासून प्राजक्ता माळी अनेक नावाजलेल्या अभिनेत्रींना हा हॅशटॅग वापरत व्हिडीओ शेअर केले होते. ‘मी लिपस्टिकचं समर्थन करत नाही...’ असं म्हणत आपली लिपस्टिक पुसत ‘बॅन लिपस्टिक’चा संदेश त्यांनी दिला होता. हे प्रकरण काय हे कळायला मार्ग नव्हता. पण कालांतराने हे वेगळं काही नसून प्रमोशनचा फंडा असल्याचं स्पष्ट झालं होतं. प्रमोशन होतं, तेजस्विनी पंडितच्या ‘अनुराधा’ (Anuradha) नावाच्या वेबसीरिजचं. आता तेजस्विनी ही सीरिज पुन्हा एका वेगळ्या कारणानं चर्चेत आहे. होय, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी या सीरिजच्या ठिकठिकाणी लागलेल्या जाहिरातीच्या होर्डिंग्सवर आक्षेप नोंदवत, दिग्दर्शकाला नोटीस बजावली आहे.
‘अनुराधा‘ या वेबसीरिजमध्ये तेजस्विनी पंडित, सोनाली खरे, सुकन्या कुलकर्णी मोने, सचित पाटील, सुशांत शेलार, विद्याधर जोशी, स्नेहलता वसईकर, संजय खापरे, आस्ताद काळे, विजय आंदळकर, चिन्मय शिंत्रे, वृषाली चव्हाण यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या सीरिजच्या निमित्ताने संजय जाधव वेबसीरिजच्या विश्वात पदार्पण करत आहेत.