मुंबईत मोठ्या दिमाखात लोकमत डिजिटल क्रिएटर अवॉर्ड २०२३ सोहळ्याला सुरुवात झाली आहे. या सोहळ्यात डिजिटल इन्फ्ल्युन्सर्सचा सन्मान करण्यात आला. यावेळी हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री रुपाली गांगुली (Rupali Ganguly) हिला टीव्हीवरील सर्वात प्रभावशाली व्यक्तिमत्त्व (Most Influential TV Personality) म्हणून गौरविण्यात आले. यावेळी मंचावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि लोकमतचे सहव्यवस्थापकीय संचालक आणि संपादकीय संचालक ऋषी दर्डा उपस्थित होते.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर रुपाली गांगुली म्हणाली की, मी खूप आभारी आहे. काम सोडून मी साडे सहा - सात वर्षे घरी होते. मला चांगली गृहिणी आणि आई व्हायचं होतं. हे माझ्या आयुष्यात महत्त्वाचं होतं. मग अचानक राजन शाही अनुपमा घेऊन माझ्या जीवनात आले. आपल्या समाजात महिला घरात मूलबाळ आणि घर सांभाळतील आणि पुरुष घराबाहेर काम करणार अशी परंपरा आहे. पण माझा नवरा मला म्हणाला की, तू काम कर मी घरातल्या जबाबदाऱ्या सांभाळेन. अनुपमा मालिका स्वीकारली तेव्हा माझा मुलगा साडेसहा वर्षांचा होता. मी अनुपमा बनण्यासाठी जाते, तेव्हा तो मला खूप मिस करतो. पण अशावेळी पुरस्काराने सन्मानित केले जाते. त्यावेळी खूप हुरूप येतो. या तीन पुरुषांमुळे आज इथपर्यंत पोहचले आहे. यावेळी तिने या मालिकेतील संपूर्ण टीमचे आभारही मानले.
अभिनेत्री रुपाली गांगुलीला कोणत्याही परिचयाची गरज नाही. TRPच्या शर्यतीत राज्य करणाऱ्या 'अनुपमा' मालिकेत अनुपमाच्या भूमिकेत ती आपल्याला पाहायला मिळते. या मालिकेतून ती घराघरात पोहचली आहे. रुपाली 'साराभाई व्हर्सेस साराभाई' मधील तिच्या कार्यासाठी देखील मोठ्या प्रमाणावर ओळखली जाते. रुपाली गांगुलीचे सोशल मीडियावर खूप मोठा फॅन फॉलोव्हिंग आहे. तिचे इंस्टाग्रामवर २.७ दशलक्ष फॉलोअर्स आहेत. रुपाली गांगुली छोट्या पडद्यावरील महागडी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिने साराभाई वर्सेस साराभाई, बिग बॉस, सुकन्या, दिल है की मानता नही, जिंदगी तेरी मेरी कहानी, भाभी, काव्यांजली या मालिकांमध्ये काम केलं आहे.