महाराष्ट्रात आजही अनेक कुप्रथा आहेत, ज्या स्त्रियांवर अन्याय करतात. ज्यात अनेकांच्या आयुष्याची, स्वप्नांची अक्षरशः राखरांगोळी होते. या सगळ्याविरुद्ध आवाज उठवणारा मराठी चित्रपट 'सोंग्या' प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. येत्या १५ डिसेंबरला 'सोंग्या' प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात समाजातील अन्यायविरुद्ध ठामपणे उभ्या राहणाऱ्या एका जिद्दी तरुणीची भूमिका अभिनेत्री ऋतुजा बागवे हिने साकारली आहे. चित्रपटात एका भारुडाच्या माध्यमातून या कुप्रथेविरुद्ध प्रभावी भाष्य करण्यात आले आहे. यासाठी ऋतुजाने भारूडकाराची वेशभूषा साकारत आपल्या देहबोलीतून अत्यंत समर्पक संदेश दिला आहे.
आजवरचा तिच्या भूमिकेपेक्षा अतिशय वेगळी भूमिका 'सोंग्या' या चित्रपटातून ऋतुजा बागवेने साकारली आहे. 'येऊ दे जरा माणुसकीला जाग माणसा' असे गीतकार गुरु ठाकूर यांचे मार्मिक शब्द संगीतकार विजय गवंडे यांनी संगीतबद्ध केले आहेत. अनिष्ट रूढी परंपरांच्या जोखडात अडकलेल्या स्त्री वेदनेचा परखडपणे वेध घेत समाजपरिवर्तनाचा प्रामाणिक प्रयत्न ‘सोंग्या’चित्रपटाच्या माध्यमातून केला असल्याचे दिग्दर्शक मिलिंद इनामदार सांगतात.
सोंग्या’ चित्रपटात मुख्य भूमिकेत ऋतुजा बागवे, अजिंक्य ननावरे, गणेश यादव, अनिल गवस, प्रदीप डोईफोडे आदि कलाकार दिसणार आहेत. निशांत काकिर्डे, राहुल पाटील, मिलिंद इनामदार ‘सोंग्या’ चित्रपटाचे निर्माते आहेत. आदर्श शिंदे, स्वप्नील बांदोडकर, मनिष राजगिरे, योगेश चिकटगावकर, स्वप्नजा लेले, अमिता घुंगरी यांचा स्वरसाज चित्रपटातील गीतांना लाभला आहे. छायांकन अरविंद के. तर संकलन निलेश गावंड यांचे आहे.