एस. एस. राजमौली (S. S. Rajamouli) हे साऊथचे दिग्गज दिग्दर्शक. सिर्फ नाम ही काफी है, असंच त्यांच्याबद्दल म्हटलं जातं. कारण प्रेक्षकांना थिएटरपर्यंत खेचून आणण्यासाठी राजामौली हे नावच पुरेसं आहे. इगा (मख्खी), मगधीरा, बाहुबली: द बिगनिंग, बाहुबली: द कन्क्लुजन, आरआरआर यांसारख्या लार्जर दॅन लाईफ चित्रपटांसाठी आपण राजमौलींना ओळखतो. 2015 मध्ये त्यांचा ‘बाहुबली’ (Baahubali) प्रदर्शित झाला. यानंतर 2017 साली ‘बाहुबली 2’ (Baahubali 2) आला. या दोन्ही सिनेमांनी प्रेक्षकांना अक्षरश: खिळवून ठेवलं. चित्रपटाने जगभर अक्षरश: धुमाकूळ घातला. राजमौलींनी दिग्दर्शित केलेल्या बाहुबलीची क्रेझ आजही कायम आहे, ते म्हणूनच.
सध्या हेच राजमौली सोशल मीडियावर ट्रेंड करत आहेत. अर्थात त्यांच्या चित्रपटामुळे नव्हे तर भलत्याच एका कारणाने. होय, बाहुबली-द बिगीनिंग आणि बाहुबली- द कन्क्लुजन या दोन्ही सिनेमात एस. एस. राजमौलींनी हॉलिवूडच्या अनेक सीन्सची कॉपी केल्याचा दावा केला जात आहे.
सध्या ट्विटरवर एक ट्विट व्हायरल होत आहे. या व्हिडीओत राजमौलींवर हॉलिवूडच्या सीन्सची कॉपी केल्याचा आरोप होत आहे. अवतार, द मिथ, किंग कांग, अॅव्हेंजर्स, हरक्युलिस, द लायन किंग अशा अनेक हॉलिवूडपटातील सीन्सपासून प्रेरणा घेऊन राजमौलींनी बाहुबलीतील सीन्स क्रिएट केलेत, असा दावा केला जात आहे.
या ट्विटमध्ये एक व्हिडीओ शेअर केला गेला. या व्हिडीओत हॉलिवूड सिनेमातील काही सीन्स आहेत आणि हे सीन्स बॉलिवूडच्या काही सीन्सशी तंतोतंत मेळ खात आहेत. या व्हिडीओवर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. विश्वास बसत नाहीये, राजमौली पण कॉपी करू शकतात, अशा आशयाच्या कमेंट्सही यावर पाहायला मिळत आहेत. सध्या सोशल मीडियावर याचीच चर्चा आहे. अर्थात अद्याप राजमौलींनी यावर प्रतिक्रिया दिलेली नाही.