प्रभासच्या बाहुबली या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरचे सगळे रेकॉर्ड मोडले आहेत. या चित्रपटाने केवळ भारतातच नव्हे तर जगभरात खूप चांगली कमाई केली आहे. या चित्रपटामुळे प्रभासला चांगलीच लोकप्रियता मिळाली. या चित्रपटानंतर प्रभास प्रेक्षकांना बॉलिवूडमध्ये पाहायला मिळणार असल्याने त्याच्या साहो या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात होते. हा चित्रपट काल प्रदर्शित झाला असून या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे.
साहो हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीपासूनच या चित्रपटाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे. हा चित्रपट हिंदी, तेलगू, तामीळ अशा तीन विविध भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवसांत 68 कोटीचा गल्ला जमवला असून केवळ हिंदी भाषेत या चित्रपटाने 24.40 कोटींचे कलेक्शन केले आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने याबाबत माहिती दिली आहे.
त्यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये लिहिले आहे की, साहो या चित्रपटाने पहिल्याच दिवशी चांगली कमाई केली आहे. या वर्षांत पहिल्या दिवशी सगळ्यात चांगली कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये साहो हा चित्रपट तिसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर भारत हा चित्रपट असून दुसऱ्या क्रमांकावर मिशन मंगल हा चित्रपट आहे.
साहो या चित्रपटात प्रभाससोबतच नील नितीन मुकेश, जॅकी श्रॉफ, मंदिरा बेदी, महेश मांजरेकर, अर्जुन विजय, एवलिन शर्मा, टीनू आनंद यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. आधी हा चित्रपट 15 ऑगस्टला रिलीज होणार होता. पण नंतर ही रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. 2 तास 51 मिनिटांच्या या चित्रपटात प्रभास जबरदस्त अॅक्शन करताना दिसत आहे. साहोला समीक्षकांकडून चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्या नसल्या तरी सोशल मीडियावर या चित्रपटाचे खूपच चांगले रिव्ह्यू पाहायला मिळत आहेत. सोशल मीडियावर ‘साहो’चे काही रिव्ह्यू व्हायरल होत आहेत. बुधवारी युएईमध्ये ‘साहो’चे स्पेशल स्क्रिनिंग झाले. यात प्रभासच्या दमदार अॅक्टिंग आणि अॅक्शनची प्रचंड कौतुक केले गेले आहे. पण चित्रपटाची कथा, व्हीएफएक्स क्वालिटीवर टीकाही झाली. काहींनी हा चित्रपट कंटाळवाणा असल्याचे म्हटले आहे.