कॉमेडीचं भन्नाट टायमिंग आणि कसदार अभिनयाच्या जोरावर त्यानं चतुरस्त्र अभिनेता म्हणून लक्ष्मीकांत बेर्डेनं ओळख निर्माण केली. करियरमध्ये कितीही चढउतार आले तरी तो डगमगला नाही. अन् अवघं जगं जिंकून घेतल्याप्रमाणे सा-यांचा ‘लाडका लक्ष्या’ म्हणून त्यानं रसिकांच्या मनात अढळ स्थान प्राप्त केलं. सा-याचा लाडका लक्ष्या अर्थात लक्ष्मीकांत बेर्डे यानं सिनेमाच्या या रंगीत दुनियेत पाऊल ठेवल्यानंतर मराठी सिनेमाच नाहीतर नाटक आणि हिंदी सिनेमातूनही स्वतःचा असा वेगळा ठसा उमटवत अनेक भूमिका अजरामर केल्या. त्यांच्या चित्रपटांमधून लक्ष्यानं ख-या अर्थानं यशाचं सर्वोच्च शिखर गाठलं.
आजही लक्ष्याला विसरणं कुणालाही शक्य नाही. म्हणूनच निवेदिता सराफ यांच्या वाढदिवशी सचिन पिळगांवकर यांना लक्ष्याची आठवण आली. निवेदिता यांच्यासह लक्ष्याचा जुना फोटो सचिन पिळगांवकर यांनी शेअर करत मिस करत असल्याची पोस्टही टाकली आहे.सोशल मीडियावर हा फोटो पाहून लक्ष्याची चाहत्यांनाही नक्कीच आठवण झाली असणार.
‘लक्ष्मीकांत-महेश कोठारे- अशोक सराफ’ हे विनोदी सिनेमाचं सार बनलं होतं. त्याचवेळी ‘लक्ष्या-सचिन पिळगांवकर आणि अशोक सराफ’ या त्रिकूटालाही रसिक प्रेक्षकानं डोक्यावर घेतलं. ‘भूताचा भाऊ’, ‘आयत्या घरात घरोबा’ या आणि अशा अनेक चित्रपटात या तिघांची धम्माल रसिकांनी एन्जॉय केली. त्यांच्या ‘अशी ही बनवाबनवी’ वर प्रेक्षक अक्षरक्षा फिदा झाले. महेश कोठारे म्हणा किंवा सचिन पिळगांवकर म्हणा या प्रत्येकाशी लक्ष्याचं चांगलं जमलं. पडद्यावरील अभिनेता दिग्दर्शक नात्यासोबतच प्रत्यक्ष जीवनातही त्यांची घट्ट मैत्री होती.
असा हा चतुरस्त्र आणि विनोदाचा बादशहा असलेला कलाकार चाहत्यांना अखेर पर्यंत हसवत राहिला. किडणीसारख्या महाभयंकर आजाराची चाहूल कुणालाही लागू न देता सा-यांच्या लाडक्या लक्ष्यानं १६ डिसेंबर २००४ ला जगाचा निरोप घेतला. मात्र त्यानं साकारलेल्या भूमिका प्रत्येक रसिकाच्या मनात आजही ठसठशीतपणे कोरल्या गेल्या आहेत. लक्ष्या आपल्यात नसला तरी त्याने गाजवलेल्या भूमिकाममधून तो आपल्यातच असल्याचे प्रत्येकालाच वाटतं. इतक्या वर्षांनंतरही लक्ष्याची जादू कमी झाली नसल्याचे वेळोवेळी पाहायला मिळतं.