मराठी तसंच हिंदी सिनेसृष्टी गाजवणारे अभिनेते सचिन पिळगांवकर (Sachin Pilgaonkar) आज 67 वा वाढदिवस साजरा करत आहेत. खरंतर त्याच्याकडे बघून वयाचा अंदाजही लागणार नाही असं कायम उत्साही त्यांचं व्यक्तिमत्व आहे. अभिनय, गाणं, डान्स, भाषेवर असलेलं प्रभुत्व अशा कित्येक टॅलेंटमुळे सचिन पिळगांवकर ओळखले जातात. त्यांच्या नावाचा एक खास किस्सा आहे. प्रसिद्ध संगीतकार आर.डी.बर्मन (R D Burman)यांच्याशी त्यांचं कनेक्शन आहे ते कसं माहितीये?
सचिन पिळगांवकर एका कार्यक्रमात म्हणाले होते, 'माझी पहिलीच हिंदी फिल्म गीत गाता चलनंतर मला बालिका वधू ऑफर झाली. त्यासाठी पंचम दा हे संगीत दिग्दर्शक होते. जेव्हा त्यांना कळलं की मी सिनेमात मुख्य अभिनेता आहे आणि त्यांना माझ्यासाठी संगीत दिग्दर्शन करायचं आहे तेव्हा ते म्हणाले मी अभिनेत्याला नीट ओळखत नाही. त्यामुळे मला त्याच्यासाठी गाणं तयार करणं थोडं अवघड जाईल. मला त्याला भेटायचं आहे. त्याला माझ्याकडे पाठवा. मी खूपच खूश झालो आणि पंचम दा यांना भेटायला गेलो. पण माझ्या मनात थोडी धाकधूकही होती.'
ते पुढे म्हणाले, 'मी जेव्हा तिथे पोहोचला तेव्हा मला बघताच ते त्यांच्या स्टाईलमध्ये म्हणाले काळजी करु नकोस आणि लाजू तर अजिबात नकोस. मी कधीच तुला ओरडणार नाही. कारण तुझं नाव सचिन हे माझ्या वडिलांचंही नाव आहे. इथेच आमच्यातला नर्व्हसपणा संपला. ते माझ्याशी दिलखुलासपणे बोलायला लागले. त्यांना बहुदा माझी बॉडी लँग्वेज आणि हावभाव बघायचे होते. मी त्यांच्याशी बोलत असताना ते पेटीवर काहीतरी वाजवत होते. काही क्षणात त्यांनी माझ्यासमोर बडे अच्छे लगते है चं संगीत तयार केलं. हीच त्यांची किमया होती आणि तीच आमच्या मैत्रीची सुरुवात होती.'
सचिन पिळगांवकरांचे वडील हे एस.डी.बर्मन यांचे मोठे चाहते होते. त्यांच्याच नावावरुन त्यांची मुलाचं नाव ठेवलं होतं. पुढे सचिन पिळगांवकर आणि एस.डी. बर्मन यांचा मुलगा आर.डी बर्मन यांची छान मैत्री झाली. सचिन पिळगांवकर आणि आ.डी.बर्मन यांच्या वयात कितीही अंतर असलं तरी दोघंही एकमेकांचे खास मित्र होते.