आपल्या आवडत्या कलाकारांच्या कुटुंबाबाबत, त्यांच्या लाइफस्टाइलबाबत जाणून घेण्यासाठी अनेक चाहते उत्सुक असतात. मागील काही दिवसांपासून सेलिब्रिटींचे लहानपणीचे फोटो ट्रेंडमध्ये आहेत. अनेक सेलिब्रिटींचे लहानपणीचे फोटो सोशल व्हायरल होत असून चाहतेही आपल्या आवडत्या कलाकाराचे फोटो पाहण्यासाठी उत्सुक असतात. सध्या अशाच एका अभिनेत्याचा लहानपणीचा फोटो चर्चेत आला आहे. विशेष म्हणजे या दिग्गज अभिनेत्याला 'महागुरू' म्हणूनही ओळखलं जातं.
फोटोत दिसणारा चिमुकला आज मराठी इंडस्ट्रीतील स्टार कलाकार आहे. हा चिमुकला बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनय, आपल्या लूक्ससाठीही लोकप्रिय ठरला होता. वयाच्या अवघ्या १० व्या वर्षांपर्यंत तब्बल ४० चित्रपटांमध्ये काम केलं होतं. विशेष म्हणजे हा चिमुकला कल्ट क्लासिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'शोले' सिनेमात भुमिकेत झळकला होता. आपल्या बालपणीच स्टार झालेला हा चिमुकला म्हणजे दिग्गज अभिनेते सचिन पिळगांवकर (Sachin Pilgaonkar) हे आहेत.
सचिन यांचे लहानपणीचे फोटो चाहत्यांना प्रचंड आवडतात. बालकलाकार म्हणून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या सचिन यांनी अनेक मराठी व हिंदी चित्रपटांमध्ये काम केले. अभिनयाबरोबरच दिग्दर्शक, गायक, संगीतकार, परीक्षक अश्या विविध भूमिका त्यांनी उत्तमरीत्या निभावल्या आहेत. तर त्यांची लेक श्रिया पिळगांवकर ही सध्या बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करतेय. ओटीटी माध्यमांमध्येही तिनं आपला ठसा उमटवला आहे.