बहुचर्चित 'बाईपण भारी देवा' हा मराठी सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. सहा बहिणींची अनोखी गोष्ट सांगणारा हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. विशेषत: हा चित्रपट पाहण्यासाठी महिला वर्ग चित्रपटगृहात गर्दी करत आहेत. आता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरलाही 'बाईपण भारी देवा' सिनेमाची भुरळ पडली आहे. सचिनने नुकतंच त्याच्या पत्नीसह थिएटरमध्ये जाऊन 'बाईपण भारी देवा' सिनेमा पाहिला. हा सिनेमा पाहिल्यानंतर तो भारावून गेला आहे.
सचिनने या चित्रपटातील कलाकारांचं कौतुक केलं आहे. 'बाईपण भारी देवा' पाहिल्यानंतर सचिनने व्हिडिओ कॉलवर अभिनेत्री दीपा चौधरीशी संवाद साधला. "अभिनंदन...मला चित्रपट खूप आवडला. आम्ही नक्की भेटू," असं म्हणत सचिनने दीपाचं कौतुक केलं. दीपाने तिच्या इन्स्टाग्रामवरुन व्हिडिओ शेअर करत पोस्ट लिहिली आहे. "स्वप्न सत्यात उतरतं तेव्हा...सचिन... द सचिन तेंडुलकर... लाखो-करोडो चाहते आहेत त्यांचे, मीदेखील त्यांच्यापैकीच एक. त्यांची भेट होणं... ही माझ्यासाठी खरंच एक फॅन मोमेंट आहे. ‘बाई पण भारी देवा’ चित्रपटाने खरंच आम्हाला भरपूर काही दिलंय पण सचिन तेंडुलकर येऊन चित्रपट बघतील... त्यांना तो आवडेल आणि त्याचं ते इतकं कौतुक देखील करतील याचा आम्ही कोणीही स्वप्नात देखील विचार नव्हता केला. पण...YES...It’s Fact... शब्दांत न मांडता येणारा पण आयुष्यभरासाठी मनावर कोरला गेलेला हा एक क्षण," असं दीपाने म्हटलं आहे.
"मालिकेच्या शूटिंग मध्ये व्यस्त असल्यामुळे मला प्रत्यक्ष स्क्रीनिंगला जाता आले नाही. ज्या व्यक्तीला आयुष्यात एकदा तरी भेटायची इच्छा होती त्याला भेटण्याची संधी समोरून चालून आलेली असता मी त्या संधीला मुकले असं वाटत असतानाच मला व्हिडीओ कॉल येतो... आणि प्रत्यक्ष सचिन तेंडुलकर यांच्याशी संवाद साधला जातो... आम्हा सर्व जणींचा अभिनय, चित्रपट त्यांना आवडला हे ऐकून खूप छान वाटलं... अजूनही हे सर्व काही स्वप्नवतचं आहे. THANK YOU निखिल साने आणि अजित भुरे आयुष्यभर लक्षात राहणाऱ्या ह्या एका अविस्मरणीय फोन साठी," असंही तिने पुढे म्हटलं आहे.
'बाईपण भारी देवा' चित्रपटात दीपा परबसह वंदना गुप्ते, रोहिणी हट्टांगडी, शिल्पा नवलकर, सुकन्या मोने आणि सुचित्रा बांदेकर या अभिनेत्रींनी मुख्य भूमिका साकारली आहे. ३० जूनला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे.