Join us

'मराठी रसिक म्हणून'...जेव्हा क्रिकेटचा देव प्रशांत दामलेंचे कौतुक करतो

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2022 4:31 PM

दामलेंच्या १२५०० प्रयोगानिमित्त सर्वच क्षेत्रातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. दरम्यान क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरनेही प्रशांत दामलेंसाठी खास फेसबुक पोस्ट केली आहे.

मराठी नाट्यसृष्टीतील विक्रमवीर प्रशांत दामले. तब्बल १२५०० नाटकाचे प्रयोग केल्याचा विक्रम त्यांनी केला आहे. सध्या एका लग्नाची पुढची गोष्ट या नाटकातून ते आपल्याला भेटत असतात. आपल्या प्रत्येक नाटकातून त्यांनी रसिकांना खळखळून हसवले आहे. त्यांचे विनोदाचे टायमिंग तर जबरदस्त आहे. उगाचच नाही त्यांना मराठी रंगभुमीवरील विनोदाचा बादशाह म्हणतात. यानिमित्त सर्वच क्षेत्रातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. दरम्यान क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरनेही प्रशांत दामलेंसाठी खास ट्विट केले आहे.

सचिन म्हणतो, 'मराठी माणसाच्या मनात मराठी रंगभूमीला एक मानाचे स्थान आहे. प्रशांत दामले हे लोकप्रिय कलाकार आज १२५०० वा प्रयोग सादर करत आहेत. एक मराठी रसिक म्हणून मला ही  अभिमानास्पद गोष्ट वाटते. त्यांच्या ह्या विक्रमी कारकीर्दीबद्दल त्यांचे मन:पुर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. ' सचिनची ही पोस्ट शेअर करत प्रशांत दामलेंनी त्याचे आभार मानले आहेत. 

'टूरटूर’ या नाटकातून त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी नाटकाचा धडाका सुरुच ठेवला. आजही त्यांच्या नाटकाच्या प्रयोगांना बाहेर 'हाऊसफुल'चा बोर्ड लागतोच. मोरुमावशी,संगीत संशयकल्लोळ  यांसारखी अनेक नाटकं तुफान गाजली आहेत. अनेक नाटकांची निर्मितीही त्यांनीच केली आहे. नाटक म्हणजे त्यांचे सर्वात जास्त आवडीचे काम असल्याचं त्यांनी अनेकदा सांगितले आहे. रसिकही कित्येकदा प्रेमाने 'ओ दामले, प्रयोग छान झाला बरं का' अशी कौतुकाची थाप देतात. नाटकाच्या प्रयोगाचा महासागर म्हणजे प्रशांत दामले असे अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने म्हणले आहे. प्रशांत दामलेंच्या प्रयोगांचा हा महासागर असाच वाढता राहो.

टॅग्स :सचिन तेंडुलकर