गेल्या आठवड्यात शुक्रवारी(१ डिसेंबर) दोन मोठे सिनेमे बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाले. त्यातीलच एक म्हणजे 'सॅम बहादूर'. विकी कौशल मुख्य भूमिकेत असलेल्या या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. अखेर शुक्रवारी हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित झाला. भारतीय लष्करातील पहिले फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या शौर्याची गाथा या सिनेमाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर मांडण्यात आली आहे. या सिनेमातील विकी कौशलच्या भूमिकेचं सर्वत्र कौतुक होत आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरही 'सॅम बहादूर' सिनेमातील विकीचा अभिनय पाहून भारावून गेला आहे.
सचिन तेंडुलकरने 'सॅम बहादूर' सिनेमाच्या स्पेशल स्क्रिनिंगला हजेरी लावली होती. हा सिनेमा पाहिल्यानंतर सचिनने प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. याबरोबरच त्याने खास पोस्ट शेअर करत सॅम बहादूरमधील विकीच्या कामाचं कौतुकही केलं आहे. 'सॅम बहादूर'मधील विकीचा अभिनय पाहून सचिन तेंडुलकरही भारावून गेला आहे. "सॅम बहादूर मला आवडला. आपल्या देशाचा इतिहास जाणून घेण्यासाठी आणि फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांचं शौर्य आणि त्यांनी केलेल्या त्यागाचं मोल समजून घेण्यासाठी प्रत्येक पिढीने हा चित्रपट पाहिला पाहिजे. विकी कौशलचा अभिनय पाहून सॅम बहादूरच आपल्यासमोर आहेत, असं वाटतं," असं सचिनने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
'सॅम बहादूर' सिनेमाच्या टीझरमध्ये विकी कौशलच्या दमदार अभिनयाची झलक पाहायला मिळाली होती. टीझर पाहूनच विकीच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक झालं होतं. त्यानंतर आता विकीने 'सॅम बहादूर'मधून प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. प्रेक्षकांबरोबरच अनेक सेलिब्रिटीही विकीच्या भूमिकेचं कौतुक करत आहेत.
दरम्यान, 'सॅम बहादूर' चित्रपटात विकी कौशलबरोबर सान्या मल्होत्रा आणि फातिमा शेख या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. सान्याने या सिनेमात विकीच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. तर फातिमा शेख माजी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या भूमिकेत आहेत. मेघना गुलजार यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून तीन दिवसांत या चित्रपटाने २५.५५ कोटींची कमाई केली आहे.